कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी एसटीत सुरक्षित अंतर ठेवा ” योजना..!
मुंबई ;१८ मार्च – एसटीच्या प्रवासामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ,प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत असून, त्यानुसार सुरक्षित अंतर ठेवून प्रवाशांना प्रवास करण्याच्या दृष्टीने काही आसणे बैठक व्यवस्थेसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही बस मधून उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे. यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच महामंडळाच्या वाहतूक शाखेने आपल्या स्थानिक प्रशासनाला पाठवून दिले आहे.
एक जबाबदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटीने या पूर्वीपासूनच करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत त्यानुसार
१.राज्यातील प्रमुख गर्दीचे बसस्थानके दिवसातून दोन-तीन वेळा सॅनिटायझर वापरून स्वच्छ धुणे.
२.प्रत्येक बस लिक्विड मिश्रित पाण्याने दररोज धुवून काढणे.
३.गर्दीच्या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मास्क व लिक्विड ची बाटली देण्यात येत आहे.तसेच,
४. प्रत्येक बसस्थानकावरील उद्घोषना यंत्रा द्वारे प्रवाशांना करोना आजारा संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.
या उपाययोजनांच्या बरोबरच गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या मधील संभाव्य संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने ,त्यांच्या बस मधील बैठक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. त्यानुसार बसेसच्या प्रत्येक दोन आसन क्षमतेच्या बैठक व्यवस्थेवर केवळ एकच प्रवासी बसवण्यात येईल. याप्रमाणे संपूर्ण बसमध्ये बस क्षमतेच्या केवळ 50 टक्केच प्रवासी बसवून, ती बस मार्गस्थ करण्यात येईल कोणत्याही बस मध्ये गर्दी टाळण्यासाठी उभे राहून प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. आवश्यकता वाटल्यास अशा ठिकाणी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत .
याबाबत सविस्तर परिपत्रक एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत निर्गमित करण्यात आले असून, प्रवासानी करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एसटीच्या या उपयोजना सहकार्य करावे, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.