कोरोना संकटकाळात रक्तदान शिबिरांसाठी आमदार शिंदे यांचा पुढाकार कौतुकास्पद
आमदार होणे हे राज्याच्या राजकारणात एक प्रभावी पद मानलं जाते. ते मिळविण्यासाठी बरेचजण अनेक वर्षे झटत असतात. आमदार झाल्यानंतर जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदारांना खूप काम करावे लागते. राज्यात अनेक असे आमदार आहेत की जे पाच व त्याहून अधिक टर्म सहज विधानसभेची निवडणूक जिंकून येतात. याचे कारण जनतेची होणारी कामे, कल्याणकारी योजना राबविण्याचा ध्यास, दांडगा जनसंपर्क आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सामाजिक बांधिलकी. अडचणीच्या काळात धावून जाण्याचा स्वभाव..असेच काम माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे करतात. ते केवळ राजकारणाचा विचार न करता अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत असल्याने त्यांच्यावर मतदार विश्वास ठेवतात.
प्रशांत आराध्ये
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून याची रूग्णसंख्या ही झपाट्याने वधारत आहे. या संसर्गजन्य आजाराच्या काळात रूग्णांना देण्यासाठी रक्ताचा तुटवडा ही जाणवत आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री हे नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करत आहेत. यास प्रतिसाद ही मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बबनराव शिंदे यांनी ही यासाठी पुढाकार घेतला असून गेले चार दिवस त्यांनी आपल्या मतदारसंघात रक्तदान शिबिर आयोजित करून पाचशेहून अधिक रक्तबाटल्या संकलित केल्या आहेत. हा उपक्रम आणखी दिवस सुरू राहणार असून दीड ते दोन हजार जणांचे रक्तदान करून घेण्याचा संकल्प आहे. यास माढा व परिसरात जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
आमदार हे शासकीय योजना, कल्याणकारी प्रकल्प, मतदारसंघातील समस्या यासाठी पाठपुरावा करताना आपण नेहमीच पाहतो मात्र माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे मतदारसंघातील प्रश्न व योजना याचा पाठपुरावा तर करतात, याच बरोबर त्यांचा समाजिक कामातील उत्स्फूर्त सहभाग नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यांनी माढा भागात राबविलेली मोफत नेत्ररोग तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांची मोहीम ही व्यापक बनली आहे. पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने हे माढा तालुक्यात अनेक वर्षे शिबिराच्या माध्यमातून सेवा बजावत आहेत. आमदार शिंदे हे या भागातील नेत्ररूग्णांच्या सोयीसाठी अनेक वर्षे हा उपक्रम राबवित आहे. आरोग्य तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा याचे आयोजन आमदार शिंदे करतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ततुटवडा जाणवत असल्याने बबनदादा शिंदे यांनी माढा तालुक्यात ते अध्यक्ष असलेल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना असो की अन्य संस्थांच्या माध्यमातून तातडीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे नियोजन केले. माढा, पिंपळनेर, टेंभुर्णी, कुर्डूवाडी यासह अन्यत्र रक्तदान शिबिर आयोजित केली जात आहे. जवळपास पाचशे ते सहाशे रक्तपिशव्यांचे संकलन आतापर्यंत झाले असून दीड ते दोन हजार जणांचे रक्तदान व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शिंदे यांचे समर्थक व संस्थांचे पदाधिकारी परिश्रम घेताना दिसतात. या संकटकाळात ज्याची सर्वात जास्त गरज आहे त्या रक्तदान मोहिमेला हाती घेवून शिंदे व त्यांच्या समर्थकांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
कोरोना संकटकाळात त्यांनी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यात सॅनिटायझर निर्मितीला सुरूवात केली व सर्व सभासदांना याचे मोफत वितरण केले आहे.