कोरोना संकट काळातील स्त्रीशक्तीचे धैर्य, योगदान इतिहास विसरणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

*आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिल्या शुभेच्छा*

मुंबई, दि. ८ :- कोरोना संकट काळात घरा-घरातल्या स्त्री शक्तीनेच कुटुंबांना आधार दिला. कठीण काळात न डगमगता सगळ्यांना सावरले. कोविड योद्धा म्हणूनही त्या आघाडीवर होत्या. या लढ्यातील त्यांचे धैर्य, योगदान इतिहास विसरणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम स्त्रीशक्ती, मातृ शक्तीला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

*महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहेच. पण तो आणखी सुरक्षित करण्याची शपथ घेऊ या. त्यासाठी वचनबद्ध होऊ या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.*

गतवर्षी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पत्राद्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यंदा कोरोना संकटामुळे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दृकश्राव्य माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, हा दिन महिलांप्रती ऋण व्यक्त करण्याचा, किंवा कर्तव्याचा भाग म्हणून नाही. तर आपण जे काही आहोत, त्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात
आयुष्यात धैर्याने साथ सोबत करणाऱ्या शक्तीला वंदन करण्याचा दिन आहे. महाराष्ट्राला शूर, कर्तबगार, समाजसुधारक, विचारवंत महिलांची मोठी परंपरा आहे. त्यामध्ये माँसाहेब जिजाऊ महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, ताराराणी, क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्यासह अनेकांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करावे लागेल, त्यांना या निमित्ताने वंदन करावे लागेल. पण त्यांचा वारसा चालवणाऱ्या आताच्या काळातील महिलांनाही वंदन करावे लागेल.
विशेषतः गेले वर्षभर कोरोना विरोधातील लढा सुरु आहे. तो अजूनही संपलेला नाही. या लढ्यात घरा-घरात महिलांनी न डगमगता, सगळ्यांना आधार दिला. कोविड योद्धा म्हणूनही आशा सेविका, परिचारिका अशा विविध जबाबदाऱ्या धैर्याने पार पाडल्या. त्यांचे हे योगदान इतिहास विसरू शकणार नाही. अशा कठीण काळात धैर्याने जबाबदारी घेणाऱ्या स्त्रीशक्ती, मातृ शक्तीला जपणे, त्यांना सुरक्षित ठेवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र सुरक्षित आहेच, पण आणखी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची शपथ घेऊ या. महिलांच्या दृष्टीकोनातून विविध क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध होऊ या.
००००

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!