कोविड आणि नॉनकोविड रुग्णांवर वेळीच उपचारासाठी पंढरपुरात समन्वय अधिकारी नेमा : पालकमंत्री

पंढरपूर.दि.29: कोविडबाधित आणि नॉन कोविड रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत यासाठी समन्वय अधिकारी नेमावा अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पंढरपूर येथे दिल्या.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाला आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज पंढरपूर येथे बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.यावेळी आमदार भारत भालके, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते. ही बैठक 65 एकर परिसरातील एमटीडीसीच्या हॉल मध्ये घेण्यात आली.

आमदार भालके यांनी कोविड विषाणूची बाधा झालेले आणि न झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. काही खासगी डॉक्टरांकडून सामान्य रुग्णांवर उपचाराला नकार दिला जातो. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचारा पासून मुकावे लागत आहे. यावर तोडगा काढला जावा, असे त्यांनी सांगितले. यावर समन्वय अधिकारी नेमला जावा. त्याने कोविड बाधित रुग्णांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहेत, आणि अनुषांगिक माहिती नागरिकांना उपलब्ध करुन द्यावी अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

पंढरपूर येथे 65 एकर परिसरात उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटर मधून कोरोना बाधित रुग्णांच्या वेळीच उपचार होतील. या सेंटरला आणि तालुक्यातील शासकीय रुग्णालयांना आवश्यकती मदत आणि निधी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला जाईल असेही,श्री भरणे यांनी सांगितले. कोविडच्या कालावधित चांगले काम करणाऱ्या आशा वर्कर यांच्या मानधनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, कोविड केअर हॉस्पिटल यांना आक्सिजनचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून सर्व ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा वेळेत होईल. कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटल येथे आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि औषधे पुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. पंढरपूर येथे लवकरच समन्वय अधिकारी नियुक्त केला जाईल असे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजना व सोयी, सुविधांची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, डॉ. प्रदीप केचे आदी उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!