कौतुकास्पद!…अनेक साखर कारखाने कर थकवित असताना पांडुरंगचा केंद्रीय वित्त विभागाकडून सन्मान

पंढरपूर- एका बाजूला अनेक साखर कारखान्यांवर जीएसटी भरला नाही म्हणून अथवा कर थकविल्याप्रकरणी बँक खातील सील करण्याची वेळ येत असताना सरत्या आर्थिक वर्षामध्ये जीएसटीची सर्व ऑनलाइन विवरणपत्रे तसेच कराची रक्कम वेळेवर व बिनचूक अदा केल्याने केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालया अंतर्गत केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाकडून प्रमाणपत्र देऊन श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास सन्मानित करण्यात आले आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

शेतकर्‍यांना चांगला ऊसदर, कामगारांना वेळेवर वेतनासह बक्षीस परंपरा यासह कारखान्यात अद्ययावत सर्व यंत्रणा, सर्वाधिक साखर उतारा यासह ऑक्सिजन निर्मितीसारखे प्रकल्प उभारणार्‍या श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा कारभार राज्यात नेहमीच आदर्श मानला जातो. आता त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे. याच भागात अनेक साखर कारखाने ऊसबिलं देत नाहीत, जीएसटी भरला नाही म्हणून त्यांची बँक खाती सील होण्याची नामुष्की ओढावत आहे. अनेकांवर आरआरसी कारवाईचा बडगा साखर आयुक्तांनी उगारला असताना पांडुरंग कारखाना मात्र कोरोनाकाळात ही आपली प्रगती अबाधित ठेवून आहे.

देशामध्ये जीएसटी कर प्रणाली आहे. यानुसार प्रत्येक महिना, तिमाही व वार्षिक अशी विविध विवरणपत्रे बिनचूक व वेळेत दाखल करावी लागतात. ते दाखल करीत असताना शेवटचा कर उपभोक्ता व उत्पादक कंपनी यांनी भरणा केलेली कराची रक्कम आणि विवरणपत्रे एकमेकांशी जुळावी लागतात. अन्यथा याचा परिणाम संस्थेला मिळणार्‍या परतावा रकमेवर होऊन विवरणपत्रामध्ये अचूकता येणे अडचणीचे होते. तथापी, पांडुरंग कारखान्याने सुरुवातीपासून संगणकीकरण केले असल्यामुळे सर्वच आर्थिक व्यवहारांमध्ये अचूकता निर्माण केलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय अंतर्गत केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाकडून प्रशंसनीय प्रमाणपत्र देऊन कारखान्यास सन्मानित केले असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले.

याबाबत कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी कार्यकारी संचालक डॉ.कुलकर्णी, करर सल्लागार शैलेंद्र जयस्वाल, अकाउंटंट राहुल काकडे, लेखापाल विभागातील सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!