गरीब कामगार व व्यावसायिकांच्या मदतीला धावली पंढरपूर बँक, 200 कोटी रू. कर्जवाटपाची तयारी
पंढरपूर, दि.5 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात सर्वच घटकांना आर्थिक फटका बसल्याने हातावर पोट असलेले कामगार व लहान व्यावसायिकांना तातडीने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेने घेतला असून यासाठी जवळपास 200 कोटी रूपयांची तरतूद केल्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ताळेबंदीनंतर जवळपास अडीच ते तीन महिन्यानंतर व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याने कर्ज घेतल्यानंतर पहिले तीन महिने कर्जफेडीचे हप्ते भरून घेतले जाणार नाहीत. यानंतर कर्ज घेणार्यांकडून रोजच्या रोज व्यवसायाच्या ठिकाणी अथवा घरातून बँकेचे लोक येवून पैसे घेवून जातील. कर्जफेडीसाठी तीन वर्षाची मुदत देण्यात आली आहे. छोट्या व्यवसाय करणार्यांकडून रोजच्या रोज कर्जाचे पैसे भरून घेतल्याने व्याज ही कमी प्रमाणात बसते. यासाठी दहा हजार रूपयांचे कर्ज घेणार्यांसाठी जनता आत्मसन्मान योजना तर पन्नास हजार रूपयांपर्यंतच्या कर्जासाठी आत्मनिर्भर योजना आणण्यात आली आहे.
जनता आत्मसन्मान योजनेत सर्व घटकांसह घरेलू कामगारांचा ही समावेश करण्यात आला आहे. रस्त्यावर बसून लहान मोेठे उद्योग करणार्यांपासून ते घरोघरी जावून काम करणार्यांना ही हे कर्ज तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी जे दहा हजार रूपये कर्ज दिले जाईल त्याचा रोजचा कर्ज हप्ता हा केवळ दहा रूपयाच्या आसपास राहिल तर आत्मनिर्भर योजने अंतर्गत पन्नास हजार रूपये कर्ज घेतल्यास याचा हप्ता पन्नास रूपयांच्या आसपास राहिल. बँक हे पैसे गोळा करण्यासाठी तात्पुरत्या कालावधीसाठी वसुली प्रतिनिधी नेमणार असून कर्जाच्या व्याजातील तीन ते चार टक्के रक्कम त्यांना पगार म्हणून दिली जाणार आहे. याच बरोबर प्रत्येक कर्जदाराचा दोन लाखाचा विमा काढला जाणार असून जर काही दुर्दैवी घटना घडली तर विमा रकमेतून कर्जाची रक्कम काढून घेतली जाईल व उर्वरित रक्कम कर्जदाराच्या कुटुंबाला मिळू शकेल.
पंढरपूर अर्बन बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर असून सर्वच शाखांमध्ये ही योजना लागू असणार आहे. या बँकेचे सर्वाधिक ग्राहक व सभासद हे सोलापूर जिल्ह्यात येथे जास्तीत जास्त कर्जपुरवठा केला जाईल. यासाठी दोनशे कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याहून अधिक रक्कम लागल्यास याची ही बँकेची तयारी असल्याचे आमदार परिचारक यांनी सांगितले. दरम्यान ही कर्ज विनातारण असल्याने तीन अथवा पाच जणांचा ग्रुप करून ती पुरविली जातील तसेच छोटे कर्जदार एकमेकांना तारण राहतील. तर आत्मनिर्भर योजनेत पन्नास हजारांचे कर्ज असल्याने पाच जणांच्या ग्रुपमधील कर्ज अडीच लाख रूपये होते व ही रक्कम मोठी असल्याने यासाठी ग्रुपमधील कोणा एकाकडून प्रॉपर्टी तारण करून देण्याची विनंती बँक करणार आहे. कर्ज देताना रिझर्व्ह बँकेचे नियम ही पाळावे लागतात असल्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक म्हणाले. याच बरोबर या दोन्ही योजने अंतर्गत कर्ज घेणार्यांना व्यावसायिकांना बँकेने आकर्षक छत्र्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. जेथे ते व्यवसाय करतात तेथे ती छत्री लावून ते आडोसा निर्माण करून शकतात. यामुळे ताडपत्री लावण्याची यापुढे छोट्या व्यावसायिकांना गरज भासणार नाही.
बँकेने समाजातील सर्व घटकांचा विचार करून या योजना आणल्या आहेत. यात सर्व व्यवसायांचा समावेश आहे. ज्याला गरज आहे त्याने कर्ज मागणी करावी. याच बरोबर लॉकडाऊनच्या काळात बँकेने अत्यावश्यक सेवेअंतर्गत जी दुकाने उघडी होती त्यांच्या दुकानात सुरक्षिततेच्या कारणास्तव बँकेने संध्याकाळी कॅश गोळा करण्याचे काम केले. रोजच्या रोज बँकेची गाडी प्रत्येक ठिकाणी जावून पैसे घेवून येत होती. या काळात बँकेने या व्यापार्यांना आरटीजीएस तसेच एनइएफटी सेवा मोफत पुरविली आहे.
मोठ्या व्यावसायिकांसाठी ही बँकेेने योजना आणली असून कॅश क्रेडिट असणार्यांच्या खात्यात तत्काळ दहा टक्के रक्कम वाढवून दिली जात आहे. बेदाणा शेतकर्यांसाठी ही पैसा उपलब्ध करून देण्यासाठी योजना आणली असल्याचे परिचारक म्हणाले.
पंढरपूर अर्बन बँक ही शंभर वर्षाहून अधिक काळ पंढरपूर व परिसरात काम करत असून येथील लहान मोठ्या व्यापार्यांना व सर्वच घटकांना अर्थपुरवठा या संस्थेने केला आहे. आता कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत येथील सर्वच घटकांना सहकार्य करण्याचे धोरण बँकेच्या संचालक मंडळाने घेतले आहे.
यावेळी संचालक मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, सरव्यवस्थापक भालचंद्र जोशी, संचालक मंडळातील उपाध्यक्ष दीपक शेटे, हरिश ताठे, पांडुरंग घंटी, विनायक हरिदास, भाऊसाहेब जगताप, उदय उत्पात, मनोज सुरवसे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.