गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदलण्याचा विचार नाही, विरोधकांची सरकार बरखास्तीची मागणी हास्यास्पद : जयंत पाटील

पंढरपूर – गृहमंत्री अनिल देशमुख हे काम करत असून त्यांना बदलण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट मतं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यावेळी त्यांनी काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या गृहमंत्र्यांवरील आरोपानंतर विरोधक करत असलेल्या सरकार बरखास्तीची मागणी हास्यास्पद असल्याचे सांगितले.
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत यासाठी उमेदवार निश्‍चित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील हे येथे आले होते. पाटील म्हणाले, आमच्या सरकारने उद्योगपती अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेली स्फोटकाची गाडी तसेच मनसूख हिरेन मृत्यूप्रकरणाचा कसून तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काहीजण या विषयापासून लक्ष विचलित करण्यासाठी अन्य मुद्दे पुढे करत तर नाहीत ना? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. राज्यात काहीही घडले की सरकार बरखास्तीची मागणी केली जाते. आता ती मागणी जनेतही हास्यास्पद होत असल्याचे दिसत आहे.
सचिन वाझे प्रकरणाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, वाझे यांचे शिवसेनेबरोबर संबंध जोडणे योग्य नाही. कारण जेंव्हा एखादा व्यक्ती पुन्हा सरकारी सेवेत पुन्हा येतो तेंव्हा तो सरकारी कर्मचारी असतो. ते परत पोलीस सेवेत परतल्यावर त्यांना तातडीने महत्वाच्या जबाबदार्‍या कोणी दिल्या तसेच अशी कामे करायला कोणी सांगितली याचा खुलासा आता हळूहळू होईल.
दरम्यान परमबीरसिंह यांच्या गृहमंत्र्यांवरील आरोपाच्या पत्राबाबत बोलताना राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, याबाबत हळूहळू खुलासे होतील. ते पत्र पाहिल्यावर आपल्याला वाटते की हे जे काही केले गेले आहे ते कोणाला तरी खूश करण्याचा प्रयत्न दिसतो. आपण कोणाचे नाव घेणार नाही. वाझे यांना एनआयए ने ताब्यात घेतल्यानंतर काही माहिती बाहेर आली आहे. यात पोलीस अधिकार्‍यांचा समावेश दिसतो आहे. आमच्या सरकारने ठरविले आहे की कितीही मोठा अधिकारी असला तरी कोणालाही पाठीशी घालायचे नाही असे ठरविले आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही पहिली आलेली प्रतिक्रिया असावी असे वाटते.
दरम्यान आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत बैठक बोलाविली असून यासाठी जयंत पाटील व अजित पवार यांना बोलाविण्यात आले आहे. यावर बोलताना पाटील यांनी ही ठरलेली बैठक असून यात नवीन काही नाही असे सांगितले.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!