ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुंबई दि. ४ : युनेस्को आणि लंडन येथील वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबध्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे.

पुरस्काराची बातमी समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (दि.३) स्वत: त्यांना दूरध्वनी करून अभिनंदन आणि कौतुक केले.

यावेळी रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागात शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी ते करीत असलेल्या उपक्रमांची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली तसेच तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करतो ते सांगितले.

क्युआर कोडच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन १४० देशांतील १२ हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ७ कोटी रुपये अशी पुरस्काराची मिळालेली रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच टीचर इनोव्हेशन फंडसाठी आपण वापरणार असल्याचे त्यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्षणासाठी दाखवलेल्या त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली आणि राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे व शिक्षणाची आवड मुलांमध्ये जोपासण्यासाठी निश्चितपणे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल असे सांगितले.

महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो आणि अशा उपक्रमशील शिक्षकांची राज्य तसेच देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे असेही मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलताना म्हणाले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!