चंद्रभागा येणार दारी…बाप्पांचे विसर्जन करा आपल्याच घरी…मनसेने पंढरीत तयार केले विसर्जन रथ
पंढरपूर,ता.31ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी मनसेच्या वतीने चंद्रभागा आपल्या दारी बाप्पांचे विसर्जन करा आपल्याच घरी ही संकल्पना राबवण्यात येत आहे.
शहरातील गणेशभक्तांना आता चंद्रभागा नदीवर न जाता चंद्रभागेचे पाणी घेवून आलेल्या रथामध्ये मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी उद्या मंगळवारपासून शहरातील विविध भागात तीस रथाद्वारे बाप्पांच्या विसर्जनाची सोय केली आहे. मनसेच्या या आगाळ्यावेगळ्या गणेश विसर्जन उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
यावर्षी कोरोनाच्या सावटामध्येच गणेश उत्सव साजरा झाला. 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी आहे. गणेशमूर्ती विसर्जनाची ठिकठिकाणी तयारीही झाली आहे. नगरपालिकेने यावर्षी प्रथमच गणेशमूर्ची संकलन सुरु केले आहे.
त्यानंतर आता मनसेनेही शहरातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी विसर्जन रथ तयार केले आहेत. या रथामध्ये पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे. यात चंद्रभागेचे पाणी असणार आहे. यात बाप्पाचे विसर्जन करुन निरोप देता येणार आहे.
मंगळवारी 1 सप्टेंबरपासून शहरातील विविध भागात सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत गणेश भक्तांच्या घरी हे रथ जाणार आहेत. त्या ठिकाणी आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन करता येणार आहे.
गणेश उत्सवात शहरातील सुमारे 9 हजाराहून अधिक गणेशभक्तांना मोफत गणेशमूर्ती भेट दिल्या होत्या. त्यानंतर आता दिलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी प्रत्येक गणेशभक्तांच्या घरी चंद्रभागेचे पाणी पोहोच करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसेच्या या गणेश विसर्जन उपक्रमामुळे चंद्रभागेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. यंदाचा गणेश उत्सव शांततेत आणि पर्यावरण पूरक साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केेले होते. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मनसेनेही यावर्षी पर्यावरण पूरक आणि प्रदुषमुक्त गणेश उत्सव साजरा करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले आहे. गणेशभक्तांनी गणेश विसर्जन रथामध्येच गणेशाचे विसर्जन करावे असे आवाहन ही मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे.यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, सागर घोडके, महेश पवार, प्रताप भोसले, अवधूत गडकरी, कृष्णा मासाळ इत्यादी उपस्थित होते.