चांगली बातमी :पंढरपूरमध्ये घेतलेले ४७ जणांच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह
पंढरपूर- शहर व तालुक्यात आजवर ६ कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आरोग्य विभागाने पंढरपूर, उपरी , गोपाळपूर तसेच चळे येथील ४७ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. याचा अहवाल आला असून सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. शहर व तालुक्यात रूग्ण आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात येत आहे. पंढरपूर शहरातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तिंचे अहवाल ही निगेटिव्ह आले आहेत.
तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्था आहोरात्र झटत आहे. तालुक्यात बाहेरुन आलेल्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. या नागरिकांनी स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी जबाबदारीने वागावे. सर्वच नागरिकांनी आपल्या घरातील 65 वर्षावरील व्यक्ती आणि 10 वर्षाखालील मुलांची काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी केले आहे.
पंढरपूरात रेडझोन मधून आलेल्या नागरिकांना बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील पंढरपूर, गोपाळपूर, उपरी आणि चळे येथील 47 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. संपर्कातील सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या संपर्कातील व्यक्तींनाही संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत.