चित्रा नक्षत्रातील पावसाने सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान
पंढरपूर– यंदा पावसाळा हंगामात दमदार पाऊस सोलापूर जिल्ह्यात झाला आहे. याच पावसाळ्यात अनेक भागात अतिवृष्टीही झाली आहे. यातून शेतकरी सावरतो ना सावरतो तोच आता पुन्हा चित्रा नक्षत्रात अनेक तालुक्यांमध्ये मोठा पाऊस झाला आहे. शनिवारी कोसळलेल्या पर्जन्याने ऊस, फळबागा तसेच सोयाबीनचे नुकसान झाले आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस पाऊस असाच राहिल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यंदा हस्त नक्षत्राने दांडी मारली होती. मात्र चित्रा नक्षत्रात चांगलाच वरूणराजा बसरू लागला आहे. तत्पूर्वीच मागील महिन्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. सांगोला, पंढरपूर, माळशिरस भागाला अक्षरशः त्या पावसाने झोडपून काढले होते. ओढे नाले भरभरून वाहले व नुकसानही यामुळे मोठे झाले होते.
कालपासून सुरू असलेल्या पावसाने करमाळा, माळशिरस, पंढरपूर, माढ्याच्या काही भागात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. करमाळा भागात ऊस आडवा होवून जमीनदोस्त झाले आहेत. हा ऊस कारखान्यांनी तातडीने गाळपाला न्यावा अशी मागणी वाढत आहे. माळशिरस तालुक्यात सोयाबीन मळणीच्या दरम्यान पाऊस आल्याने नुकसान झाले आहे. याच बरोबर सततच्या पावसाने डाळिंब, केळी सारख्या बागांचे नुकसान होत आहे. काढणी झालेली बाजरी व मका अनेक ठिकाणी भिजला आहे.