चैत्री एकादशी मात्र सुनी पंढरी..चंद्रभागा वाळवंटात नीरव शांतता
पंढरपूर, दि. 4- कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्राची दक्षिण काशी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आज चैत्री एकादशीचा सोहळा विना भाविक पार पडला. एरव्ही लाखो भाविकांच्या उपस्थितीने व हरीनामाच्या गजराने दुमदुमलेली पंढरी आज सुनसान दिसत होती. चंद्रभागेच्या वाळवटात नीरव शांतता होती.
कोरोना विषाणूमुळे सार्या देशात संचारबंदी पुकारण्यात आली आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर तर 17 मार्च पासूनच भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. रोजच्या पूजा व परंपरा पाळल्या जात आहेत मात्र भाविकांसाठी दर्शन बंद आहे. शुक्रवारी चैत्री म्हणजे कामदा एकादशी होती. प्रतिवर्षी या सोहळ्याला किमान 3 लाख भाविक हजेरी लावतात. याच यात्रेदरम्यान शिखर शिंगणापूरच्या श्री शंभू महादेवाची यात्रा ही असते. यामुळे पंढरीत भक्त कावडी घेवून मोठ्या प्रमाणात येत असतात. यासाठीच पंढरीची चैत्री ही हरिहराची यात्रा म्हणून प्रसिध्द आहे.
मात्र कोरोना विषाणूमुळे अलिकडच्या काळात पहिल्यांदाच विठ्ठल मंदिर अनेक दिवस बंद आहे. येथे आज एकादशी दिवशी ही केवळ शांतता होती. सर्व रस्ते निर्मनुष्य होते. चंद्रभागेचे वाळवंटाला यात्रा कालावधीत भक्तीचा महापूर असतो मात्र तेथे ही आज केवळ शांतता होती. पहाटे श्री विठ्ठलाची पूजा मंदिरे समितीचे सदस्य आमदार सुरजितसिंह ठाकूर यांनी तर माता रूक्मिणीची पूजा सदस्य संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाली पुदलवाड हे उपस्थित होते. कोरोनामुळे देशावर आलेल्या संकटाशी मुकाबला करण्याचे धैर्य आणि बळ दे व सर्वांची या संकटातून लवकर मुक्तता कर, असे साकडे आमदार सुरजितसिंह ठाकूर यांनी श्री विठ्ठल व रखुमाईला घातले.
दरम्यान एकादशीला दिंड्यांची नगरप्रदक्षिणा असते. मात्र संचारबंदी असल्याने यंदा मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने वारकरी पंढरीत आलेले नाहीत. यामुळे येथे असणार्या स्थानिक तीन – चार महाराज मंडळींनीच सोशल डिस्टन्सिंग पाळत प्रदक्षिणा पूर्ण केली. यंदा वारीला भाविकांनी येवू नये असे आवाहन वारकरी संप्रदाय व मंदिरे समितीने केले होते. घरी राहूनच विठ्ठल भक्तांनी विठुनामाचा जप करत चैत्री यात्रेचा सोहळा साजरा केला.