भारतनानांप्रमाणेच भगिरथदादांचाही जनसंपर्कावर भर, मतदारांमधून चांगला प्रतिसाद

पंढरपूर- आमदार कै. भारत भालके यांनी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात जनसंपर्काच्या जोरावर सलग तीन निवडणुकांमध्ये यश मिळविले होते. मात्र त्यांचे निधन झाल्याने आता पोटनिवडणूक होत असून यात त्यांचे चिरंजीव भगिरथ यांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. दादा या नावाने प्रसिध्द असणार्‍या भगिरथ यांनी आता कै.भारतनानांच्या पावलावर पाऊल टाकत जनसंपर्कावर जोर दिला आहे. यात त्यांना त्यांच्या पत्नी डॉ. प्रणिताताई भालके यांची साथ मिळत असून त्या महिलांच्या भेटी घेत आहेत.
आमदार कै. भारत भालके हे स्वतःच स्टार प्रचारक होते. त्यांनी 2009 च्या निवडणुकीपासून कधीच कोणावर आपल्या प्रचाराची जबाबदारी सोपवली नव्हती. ते आपले नियोजन आपणच करायचे. त्यांनी लढविलेल्या तीन निवडणुकांचा विचार केला तर त्यांचे पक्षही वेगवेगळे होते. त्यांची सारी भिस्त ही जनसंपर्कावर होती , त्यामुळे ते ज्या पक्षातून उभे राहात जनता त्यांच्या पाठीशी राहिली. लोकांच्यात सहज मिसळणारा.. आस्थेने चौकशी करणारा.. सर्वसामान्यांना आवर्जुन जवळ बोलावून त्यांच्या समस्या ऐकणारा आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. कै. भारत भालके यांनी लोकांना मदतही मोठ्या प्रमाणात केली होती. यामुळेच त्यांच्यावर पंढरपूर व मंगळवेढ्यातील जनतेचा विश्‍वास होता. संस्थांचे जाळे निर्माण करण्यापेक्षा माणसं जोडण्याचे काम त्यांनी केले होते.

आता त्यांच्या पश्‍चात भालके कुटुंबातून राष्ट्रवादी भगिरथ यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीही सुरूवातीपासूनच जनसंवाद यात्रेच्या माध्यमातूनच लोकांशी संपर्क वाढविला आहे. यात त्यांना साथ मिळत आहे ती त्यांच्या पत्नी डॉ. प्रणिताताई भालके यांची. त्यांनी महिलावर्गांशी संपर्क वाढविला असून पंढरपूर व मंगळवेढ्यात त्या दौरे करीत आहेत. महिला भगिनींशी संवाद साधत आहेत. भगिरथ व डॉ. प्रणिताताई भालके यांनी दोन्ही तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून मतदार भेटीचा उपक्रम हाती घेतल्याने त्यांची थेट नागरिकांशी चर्चा होत आहे. यात कै. भारत भालके यांच्या आठवणींनी अनेकजण भावनिक होताना दिसतात.
भगिरथ भालके हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी त्यांनी 2009 पासून भारत भालके यांच्या निवडणुकीचे कामकाज सांभाळले आहे. त्यांच्या साथीला व्यंकटराव भालके असून ते दोन्ही तालुक्यात सतत मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता सुरू असून यात आरोप प्रत्यारोप होणार हे निश्‍चित आहे. मात्र सध्या तरी भगिरथ भालके यांनी मात्र जनतेसमोर आपली बाजू मांडण्याची भूमिका घेतली आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!