जगद्गगुरू आणि माउलींच्या पालखी सोहळा प्रस्थानावेळी ५० भाविकांना उपस्थितीची परवानगी

पुणे – शुक्रवार १२ जून रोजी श्रीक्षेत्र देहूहून जगद्गगुरू संत तुकाराम महाराज तर शनिवार १३ रोजी श्रीक्षेत्र आळंदीहून संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत असून कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी देहू व आळंदीत मंदिर परिसराच्या आत या सोहळ्यासाठी कोरोना विषाणू प्रतिबंधक आरोग्य विषयक सर्व नियमांचे पालन करून जास्तीत जास्त ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा भाविकांच्या अत्यंत कमी संख्येच्या उपस्थितीत पालख्यांचे प्रस्थान होत आहे. तिथीनुसार या पालख्यांचे प्रस्थान आता होत असले पंढरपूरला त्यांना नेण्याचे प्रशासनाचे नियोजन होईपर्यंत या पालख्या देहू व आळंदीच मुक्कामी असणार आहे. पालखी सोहळे वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्वाचे असून ही परंपरा कोरोना सारख्या महामारीत ही खंडीत होवू यासाठी राज्य सरकारने आषाढी एकादशीला प्रमुख संतांच्या पादुका तीर्थक्षेत्र पंढरपूरला नेण्यास परवानगी दिली आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर तयारी केली जात आहे. यासाठी बसेस अथवा हेलिकॉप्टरचा ही वापर केला जावू शकतो असे संकेत पुण्याच्या बैठकीत सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत.
संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांच्या प्रस्थान सोहळ्याची तयारी झाली असून शुक्रवारी पहाटे ५ वाजता महापूजा होईल . दुपारी २ वाजता संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे व पालखी सोहळा प्रमुखांच्या हस्ते प्रस्थानपूजा होईल. दुपारी २ वाजता पादुका भजनी मंडपात फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान होतील. त्यानंतर आरती होइल व आषाढ शुध्द दशमीपर्यंत पादुका भजनी मंडपातच राहतील. शासनाच्या नियोजनानंतर या पादुका पंढरपूरला नेण्यात येतील. प्रस्थान सोहळ्यासाठी देहू संस्थानने ५० लोकांना परवानगी द्यावी अशी मागणी केली होती ती मान्य झाल्याचे पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी सांगितले .
श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शनिवार १३ जून रोजी प्रस्थान होत आहे. याची तयारी पूर्ण झाल्याचे प्रमुख विश्‍वस्थ अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांनी सांगितले. शनिवारी पहाटे नैमित्तिक पूजा होईल यानंतर सायंकाळी ४ वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे. संस्थान व हैबतबाबांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते माउलींची आरती होवून पादुका सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्याकडे सुपूर्द केल्या जातील. सायंकाळी ५ वाजता त्या वीणा मंडपात ठेवलेल्या व फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान होतील. मंदिर प्रदक्षिणा होवून पालखी आजोळ घरी मुक्कामी जाईल. अशी माहिती सोहळाप्रमुख योगेश देसाई यांनी दिली.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!