जगातील सगळ्यात मोठे डेस्क कॅलेंडर पंढरपूरमध्ये
पंढरपूर – येथील श्री. व सौ. सविता रवी सोनार या दाम्पत्यांची कन्या कु. रेवती हिला तिच्या वाढदिवसाचे औचित् साधून तिचा भाऊ चि. ओंकार याच्याकडून भेट म्हणून देण्यात आलेले डेस्क कॅलेंडर हे सर्वात मोठे कॅलेंडर असल्याचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड च्या वतीने प्रमाणित करण्यात आले आहे.
सात फूट उंच आणि दहा फूट रुंद या आकारात असलेले एकूण सत्तर चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे कॅलेंडर सात पानांचे असून पहिल्या पानावर वर्षभरातील बारा महिन्यांचे दिनांक व वार दिलेले आहेत. तर उर्वरित सहा पानांवर प्रत्येकी दोन महिन्यांचे दिनांक व वार दिलेले आहेत. शिवाय त्या सहा पानांवर कवी रवी सोनार यांचे बहिण या विषयावरील सुविचार आहेत.
एका लोखंडी फ‘ेमवर हे भव्य-दिव्य डेस्क कॅलेंडर असून सर्व पाने महिन्या नुसार बदलणे शक्य आहेत. कु. रेवती सोनार हिच्याकडे असणार्या कॅलेंडरला जगातील सर्वात मोठे डेस्क कॅलेंडर असे प्रमाणित करताना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक देऊन गौरविले आहे.
या डेस्क कॅलेंडरचे जगातील सर्वात मोठे डेस्क कॅलेंडर म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् या आंतरराष्ट्रीय पातळीवरील रेकॉर्ड बुक मध्येही नोंद व्हावी म्हणून कु. रेवती सोनार प्रयत्नशील आहे.