जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन
पंढरपूर,दि.23: कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जीवनाश्यक वस्तू विक्रीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही यांची दक्षता व्यापार्यांनी व नागरिकांनी घ्यावी. तसेच गर्दी व एकमेकांपासून दूर राहण्याची स्वयंशिस्त पाळा. असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले आहे.
गुढीपाडवा सण जवळ आल्याने नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दुकानात गर्दी करतात. व्यापार्यांनी दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या ग्राहकांनी मालाची मागणी केली त्या वस्तूंची यादी मोबाईलवर मेसेजव्दारे अथवा व्हॉटस्अॅपव्दारे मागावी. तसेच सर्व यादीतील माल काढून झाल्यानंतर त्यांना मेसेजव्दारे कळवावे. जेणेकरुन गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. व्यापार्यांनी ग्राहकांसाठी हात धुण्याची व ‘सॅनेटायजर’ची व्यवस्था करावी. प्रत्येक व्यक्तीमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवावे. शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांनी एकाच ठिकाणी गर्दी करु नये. काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच थांबावे असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कवडे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यातील सर्व नागरी भागात कलम 144 अर्थात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 31 मार्च 2020 पर्यंत जीवनाश्यक वस्तू,औषधे, फळे, भाजीपाला वगळून इतर गर्दी होणारे ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. आदेशानवये नागरिकांना एकत्र जमाव करण्यास प्रतिबंध लागू करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा डॉ. कवडे यांनी दिला आहे.