जुलैचा पहिला आठवडा संपला तरी उजनी अद्याप मृतसाठ्यातच

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण हे जुलै महिन्याचा पहिला आठवडा लोटला तरी अद्याप मृतसाठ्यातच असून भीमा खोर्‍यात पावसाने ओढ दिल्याने हा प्रकल्प भरण्यास विलंब होत आहे. यामुळे जलाशयकाठासह सोलापूर जिल्ह्याच्या लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

आजची उजनीची स्थिती ही वजा 9.36 टक्के अशी आहे. धरण उपयुक्त साठ्यात भरण्यास सुरूवात होण्यासाठी आणखी 5 टीएमसी पाण्याची गरज आहे. उजनी जलाशय परिसरात जून महिन्यात 115 मिलीमीटर पावसाची नोंद असली तरी हे महाकाय धरण भरण्यासाठी भीमेच्या उपनद्यांच्या परिसरात व जलाशयकाठी मुसळधार पावसाची आवश्यकता असते. यंदा मे महिन्यात तौक्ते वादळाच्या वेळीही उजनीवर पावसाची नोंद होती. असे असले तरी या 121 टीएमसी क्षमतेच्या धरणाला भरण्यासाठी पुणे जिल्ह्यासह भीमा खोर्‍यात दमदार पावसाची गरज असते. उन्हाळ्यात या प्रकल्पातून सिंचनासह भीमा नदीत प्रत्येकी दोन आवर्तन सोडली गेली होती यामुळे हे धरण वजा 22.42 टक्के अशा स्थितीत होते. जून महिना व जुलैच्या पहिल्या आठ दिवसात धरणात जवळपास 13 टक्के पाणी आले असले तरी ते पुरेसे नाही. हा प्रकल्प भरण्यासाठी पर्जन्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाची गरज आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!