जो निष्कार्य स्थितीला प्राप्त झाला त्यालाही कर्मत्याग शक्य नाही : किशोर महाराज खरात

श्री क्षेत्र आळंदी दि. १५ – जो निष्कार्य स्थितीला प्राप्त झाला त्यालाही कर्मत्याग शक्य नाही . कारण जो पर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म करावेच लागते . कर्मयोग या तिसऱ्या अध्यायात माउलींनी कर्मयोगाची व्याख्या स्पष्ट केली आहे असे ह.भ. प. किशोर महाराज खरात यांनी सांगितले .
आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफएम इंडिया रेडिओ यांच्या वतीने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( सोमवार ) सिन्नर जि नाशिक येथील ह भ प किशोर महाराज खरात यांनी श्री ज्ञानेश्वरीच्या कर्मयोग या तिसऱ्या अध्यायावर निरुपण केले .

मग अज्ञाने बांधलेया I
मोक्षपदी बैसावया II
साधनारंभु तो तृतिया I
अध्यायी बोलीला II

या श्री ज्ञानेश्वरीच्या ओवीवर निरुपण करताना खरात महाराज म्हणाले , मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मोक्षप्राप्ती असून मोक्षप्राप्तीचे साधन ज्ञान आहे. गिता हे मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रदान शास्त्र आहे. परंतू ज्ञान प्राप्तीकरीता अधिकार हवा. तो अधिकार प्राप्त करण्याकरिता अज्ञानाने बांधलेल्या जीवांचा कर्म उपासनेचा मार्ग गितेत (ज्ञानेश्वरीत) सांगितला आहे. मोक्षप्राप्तीकरीता अगोदर अंत:करण शुध्द असावे लागते. कर्माने अंतःकरण शुद्धी होते, उपासनेने अंतःकरण स्थिर होते , स्थिर चित्तात ज्ञान प्रगत होते व ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो असा शास्त्रक्रम आहे आणि त्याचा आरंभ तिसऱ्या अध्यायात कर्मापासून झाला आहे म्हणून तिसऱ्या अध्यायास साधनारंभु असे म्हंटले आहे.

अर्जुन देवास तृतीय अध्यायारंभी प्रश्न करतो की , मागे द्वितीय अध्यायात निष्काम कर्मापेक्षा जर आत्मविषयक ज्ञान श्रेष्ठ आहे असे तुझे मत आहे तर मला युध्द करावयास प्रवृत्त करून घोर कर्म का करवितोस? म्हणून संदिग्ध वाक्य बोलून माझा बुध्दीभ्रम करू नकोस. माझ्या हिताचे जे असेल ते एकच मला सांग आणि हे तुला विचारण्याचा माझा अधिकार देखील आहे. अनेक जन्म उपासना करून तुझी प्राप्ती झाली आहे व आईप्रमाणे तुझी माझ्यावर प्रेमाची पाखरही आहे.
अर्जुनाच्या वरील प्रश्नाचे उत्तर म्हणजेच तृतीय अध्याय जो कर्मयोग म्हणून प्रसिध्द आहे. मंद अधिकाऱ्याकरीता कर्म मार्ग सुखकर आहे. जो निष्कार्य स्थितीला प्राप्त झाला त्यालाही कर्मत्याग शक्य नाही. कारण जोपर्यंत शरिर आहे तोपर्यंत कर्म करावेच लागते. जेथे निरिच्छ झालेल्याची ही कथा तेथे वासनासक्त पुरूषाने विहीत कर्म टाकून कर्मातित होण्याचा का आग्रह करावा?

वास्तविक प्रत्येकाने अहंकार टाकून फळाविषयी अनासक्त राहून कर्म केले तर त्याला मोक्षप्राप्तीपर्यंत जाता येते असे वागणे हाच नित्ययज्ञआहे.
असा यज्ञ मागे जनकादीकांनी करून मोक्षसुख मिळविले. जनकादिकांचे काय, प्रत्यक्ष मी पूर्ण काम असून प्राणीमात्रांचे माझ्याकडे पाहूनच चालतात. म्हणून त्यांच्याकरीता सकाम पुरूषांप्रमाणे मीही कर्माचरण निमुटपणे करतो असे असल्यामुळे अर्जुना तुला प्रस्तुत जे क्षत्रियांचे लढण्याचे कर्म प्राप्त झाले आहे. ते तू कसे टाकणार? हातात धनुष्य घे आणि लढ. पृथ्वीला दुष्टांच्या मारापासून वाचव. किर्ती वाढव त्याशिवाय तुला गत्यंतर नाही असे , खरात महाराज यांनी तिसऱ्या अध्यायाचे निरुपण करताना सांगितले .

या कार्यक्रमाचे निवेदन ह भ प स्वामीराज महाराज भिसे यांनी केले .उद्या मंगळवार दि . १६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता श्री क्षेत्र पंढरपूर येथील ह भ प भानूदास महाराज टेंबुकर हे ज्ञानसंन्यासयोग या चौथ्या अध्यायावर ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर निरुपण करतील .

दरम्यान आज ( सोमवार ) पहाटे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्थ लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते माउलींच्या पादुकांची विधीवत पूजा , अभिषेक व आरती करण्यात आली . यावेळी त्यांच्या पत्नी अंजली देशमुख , बाळासाहेब चोपदार हे उपस्थित होते . पूजेचे पौरोहित्य यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी केले . दुपारी माउलींना नैवेद्य दाखविण्यात आला . रात्री खडकतकरांच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!