ज्ञानेश्वरी ज्ञानराज माउलींची ग्रंथपुण्यसंपत्ती : ह.भ.प.डॉ. रविदास महाराज शिरसाठ

श्री क्षेत्र आळंदी दि . १ – ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी सकलविषय संपन्नतेच्या बाबतीत वेदापेक्षाही पाऊलभर पुढे आहे असे मानावे लागेल. भौतिकशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, दर्शनशास्त्र, अध्यात्मशास्त्र या आणि तत्सम अन्यान्य शास्त्रांना ज्या ग्रंथामुळे सुप्रतिष्ठा प्राप्त झाली, तो ज्ञानेश्वरी ग्रंथ वारकरी तत्त्वज्ञानाच्या पायाभूतस्थानी विराजमान असून सर्वांना शिरोधार्य आहे, हे वारकरी संप्रदायाचे महद्भाग्य आहे. अखिल मानवजातीला आदर्शभूत असणा-या या ग्रंथराजाची एवढी महानता असण्याचे मुख्य कारण हे आहे कि तो ज्ञानोबारायांच्या असाधारण पुण्याईचा शब्दाविष्कार आहे, म्हणजेच ती ज्ञानराज माउलींची ग्रंथपुण्यसंपत्ती आहे असे मत ह.भ.प. डॉ. रविदास महाराज शिरसाठ यांनी व्यक्त केले .

आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफ एम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . आज आषाढी एकादशीला या अठराव्या अध्यायाचे निरुपण व श्री ज्ञानेश्वरी निरुपणाची सांगता डॉ शिरसाठ यांनी केली .

डॉ. शिरसाठ म्हणाले , अठराव्या अध्यायाचे उत्तरार्धाचे चिंतन आपण करत आहोत. बुद्धिकायावाचेने माझा आश्रय केलेला तो कर्मयोगी सर्वदा सर्व कर्मे मला अर्पण करून माझ्या प्रसादाने शाश्वत व अव्यय पद मिळवितो. म्हणून अर्जुना तू सुद्धा आपली सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पून बुद्धियोगाचा आश्रय करुन सर्वदा माझ्या ठिकाणी चित्त जडलेला असा हो. माझ्या प्रसादामुळे तुला सर्व दुर्गमे सुगम होतील. अदृष्ट ज्याच्या अधीन आहे तो ईश्वर तुझ्या हृदयात आहे. त्याला सर्वभावाने शरण जा. त्याच्या प्रसादाने तुला सर्वोपशांती प्राप्त होऊन तू निजात्मपदीचा राजा होसील.
यानंतर भगवंत संपूर्ण गीता तत्त्वज्ञानाचा उपसंहार करून अर्जुनास सुचवितात,

*इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया।*
*विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु।।*

या देवाच्या बोलण्यावर अर्जुन उगीच गप्प राहिला, तेंव्हा भगवंत अर्जुनाचा गप्प राहण्याचा अभिप्राय जाणून सर्वगुह्यतम, निर्मळ असे संपूर्ण गीतेचे सार

*मन्मना भव मद्भक्तो..* आणि *सर्वधर्मान्परित्यज्य..*
या दोन श्लोकात सांगतात. त्यानंतर भगवंतांनी आपल्या हृदयातील बोध आलिंगन कृपेने अर्जुनाच्या हृदयात स्थित केला. यानंतर गीतेची महती सांगून,

*तया अर्थजातां अशेषा।*
*केला तात्पर्याचा आवांका।*
*तो अठरावा हा देखा।*
*कलशाध्याय।।*

असे अठराव्या अध्याया विषयी गौरवोद्गार काढतात. गीताज्ञान संप्रदानाची पद्धती स्पष्ट करून पुढे अर्जुनाला झालेला बोध त्याच्याकडून वदवून घेतात. शेवटी हर्षनिर्भर, कृतार्थ संजय संपूर्ण महाभारताचे सार

*यत्र योगेश्वरः कृष्णो..*

या श्लोकातून व्यक्त करुन पांडवांचाच विजय सूचित करतो. हा व्यासशिष्य संजयाचा पूर्णोद्गार आहे.
यानंतर ज्ञानोबारायांनी गीतेची महती, व्यासमुनींचे विश्वावर असणारे उपकार, ग्रंथकर्तृत्व परिहार, निवृत्तीनाथांच्या कृपेविषयी कृतज्ञता व्यक्त करुन ज्ञानेश्वरी ग्रंथवैभव स्पष्ट केले. आपल्या गुरुपरंपरेचा कृतज्ञतेने उल्लेख करुन संतकृपेमुळे गीतेवर यथार्थ भाष्य करणे शक्य झाल्याचे कृतज्ञतापूर्वक सांगतात. यानंतर वैश्विक कल्याणाच्या उदात्त हेतुने विश्वात्मक श्रीगुरुंकडे पसायदान मागतात. त्यातील माऊलींची भूमिका व पसायदानाचा आशय पाहता ती एक आदर्श विश्वप्रार्थना ठरते. शेवटी ज्ञानेश्वरी लेखन , स्थळ, काल यांचा उल्लेख करुन सर्व प्राणिमात्रांच्या उत्तरोत्तर कल्याणासाठी माऊलीच्या अंतःकरणाने वरप्रसादरुपी सद्भावना व्यक्त करतात,

*पुढती पुढती पुढती।*
*इया ग्रंथपुण्यसंपत्ती।*
*सर्वसुखी सर्वभूतीं।*
*संपूर्ण होईजे।।*

आपल्या जीवनात ते शुद्ध पुण्य प्राप्त होऊन जीवन सुखी व्हावे असे वाटत असेल तर आपणही ज्ञानेश्वरीचे पारायण, चिंतन, अभ्यास करुन त्या पुण्याबरोबरच ज्ञानोबारायांची कृपाही प्राप्त होईल. या कार्यक्रमाचे निवेदन ह. भ. प. स्वामीराज महाराज भिसे यांनी केले .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!