ज्ञानेश्वरी म्हणजे सत्यवाणीचे अलौकिक पुण्य
ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनमालिकेस प्रारंभ
श्री क्षेत्र आळंदी दि १३ – हजारो जन्मांची साधना, सत्यवाणी आणि गाठीशी असलेलं अलौकिक पुण्य या सगळ्याचं फळ म्हणजेच श्रीज्ञानेश्वरी आहे अशी भावना ज्ञानेश्वर महाराजांनी स्वमुखाने व्यक्त केली आहे असे मत डोंबिवलीचे ह.भ. प. जयेश महाराज भाग्यवंत यांनी व्यक्त केले .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी पायी वारीचा सोहळा नसल्याने जगभरातील वैष्णवांना घरबसल्या वारीचा आनंद घेता यावा म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफएम रेडिओ यांच्या माध्यमातून शनिवार दि . १३ जून ते बुधवार दि १ जुलै दरम्यान ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे फेसबुकद्वारे निरुपण उपक्रम आयोजित केला आहे .
श्री ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचे निरुपण करताना ह भ प भाग्यवंत महाराज म्हणाले ,
माझिया सत्यवादाचे तप |
वाचा केले बहुत कल्प |
त्या फळाचें हे महाद्वीप |
पातली प्रभूं || १६ – ३२ ||
शके १२१२ पासून आजमितीपर्यंत समस्त जगातील श्रोतावर्ग श्री ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून या मधूर फळाचे रसपान करीत आहेत, आस्वाद घेत आहेत . ज्ञानेश्वरी हा एक भव्य, दिव्य आणि पावन असा ग्रंथ आहे. आजही लाखो लोक ज्ञानेश्वरीतील शब्दांच्या आणि त्यातील ओव्यांच्या संगतीने पावन आणि शांत होत असलेली आपल्याला पाहायला मिळतात .
वयाच्या केवळ १६ व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी महाराष्ट्राची संस्कृती मजबूत करणारा हा दिव्य धर्मग्रंथ जगासमोर प्रस्तुत केला . वयाच्या २१व्या वर्षी ज्ञानोबारायांनी आपला कार्यभाग सम्पवुन समाधिस्थ होण्याचा निर्णय घेतला आणि आपली ही भौतिक यात्रा थांबवली. या त्यांच्या लहानश्या दिसणाऱ्या जीवनप्रवासात त्यांना समाजाकडून अनंत आघात आणि प्रचंड त्रास सहन करावा लागला . परंतु सम्पूर्ण ज्ञानेश्वरी मध्ये माउलींनी लोकांच्या या गैरवर्तनाबद्दल एक शब्दही उच्चारला नाही, यातून श्रीज्ञानोबांची ज्ञानमय आणि अलिप्तवृत्ती दिसून येते. किंबहुना ज्ञानेश्वरीचा शेवट जर आम्ही पहिला तर आमच्या लक्षात येईल की या संपूर्ण विश्वाच्या सुखाची अभिलाषा ज्ञानेश्वर महाराज व्यक्त करतात.
किंबहुना सर्वसुखी |
पूर्ण होऊनी तीन्ही लोकी | भजीजो आदीपुरुखी |
अखंडित ||
अशा या श्रेष्ठ ग्रंथराज असणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचा आज आरंभ म्हणून प्रथम अध्याय आणि त्यामागची भूमिका आपण अवलोकन करायची आहे. आरंभी ओंकारस्वरूप श्रीमहागणपतीला नमस्कार करून मंगलाचरणाच्या शिष्टाचाराचं ज्ञानदेवांनी पालन केलेलं आहे. पुढे श्रीशारदेला आणि गुरुरायांना नमन करून श्रीमद्भगवद्गीता व महाभारत ग्रंथाची अपूर्वता व्यक्त केली. श्रवणासाठी श्रोत्यांना विनंती केली,
तियापरी श्रोतां | अनुभवावी हे कथा |
अतिहळूवारपण चित्तां | आणूनियां || १-५७ ||
परी येथ असे एकू आधारू|तेणेंची बोले मी सधरूं |जै सानुकूळ श्रीगुरु | ज्ञानदेवो म्हणे || १-७५ ||
गीतार्थ करण्याला गुरूंचा आधार आहे अशी भावना व्यक्त करून स्वतःचा आणि गुरूंचा संतोष जाणून, गीतार्थ करण्यास त्यांनी आरंभ केला.पुढे महाभारतीय युद्धाची थोडक्यात अभिव्यक्ती करून, गीतेच्या आरंभाची पूर्वपीठिका स्पष्ट करून दिली. सर्व स्वजनांना रणांगणावर युद्धासाठी समोर पाहून, अर्जुनाच्या मनात भिन्न भावना निर्माण होत आहेत हे पाहुन देवाने अर्जुनाच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. अर्जुनाने स्वस्थिती देवासमोर व्यक्त केली. निर्माण झालेला मोह, करुणा, प्रेम, मनाचा घोटाळा, मनाची बदलेली स्थिती, ई. सर्व बाबी प्रकट केल्या. युद्धामध्ये स्वजनांचा वध करणे म्हणजे महापातक आहे आणि यामुळे कुळाचा नाश होईल त्याचे पातक वेगळं, आणि यामुळे देव अंतरला जाईल,
जरी वधू करुनि गोत्रजांचा |
तरी वसौटा होऊनी दोषांचा |
मज जोडलासि तूं हातींचा |
दूरी होसी || १-२२८ ||
या सर्व भीतीने अर्जुनाने गांडीव धनुष्य खाली ठेऊन रथाखाली उतरला आणि रथाखाली उतरल्यानंतरची अर्जुनाची स्थिती वर्णन करून माउलींनी पहिल्या अध्यायाला विराम दिला. या पहिल्या अध्यायाच्या निरुपणाचे निवेदन ह भ प स्वामीराज महाराज भिसे यांनी केले .
उद्या रविवार दि . १४ रोजी सायंकाळी ४ वाजता पाथर्डी जि . अहमदनगरचे ह भ प जगन्नाथ महाराज गर्जे यांची निरुपण सेवा होणार आहे .