ज्येष्ठ व दिव्यांग भक्तांना विठ्ठल मंदिरापर्यंत आणण्यासाठीच्या दोन ई रिक्षांचे लोकापर्ण
पंढरपूर, दि.21- मंदिर सुरक्षेच्या कारणास्तव श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणार्या सर्वच भाविकांना ठराविक अंतरावरून चालत जावे लागते. अशावेळी ज्येष्ठ व दिव्यांग भाविकांना याचा त्रास होतो हे लक्षात घेवून मंदिरे समितीच्या सदस्या अॅड. माधवी निगडे व वेणू सोपान वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने ई रिक्षाची सोय करण्यात आली असून 9 लाख रूपये किंमतीची दोन वाहने मंदिरे समितीला देण्यात आली आहेत. याचे लोकापर्ण रविवारी सकाळी करण्यात आले.
यावेळी न्या. अच्चुत कराड, ह.भ.प.बंडातात्या कराडकर, केशव महाराज नामदास, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार, राणा महाराज वासकर, मंदिरे समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, अॅड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, वेणू गोपाल फाउंडेशनच्या वंदना गायकवाड उपस्थित होते.
सुरक्षेच्या कारणास्तव श्री विठुरायाचे मंदिराकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते खासगी वाहनांना बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वयोवृद्ध भाविकांना प्रदक्षिणा मार्गावरुन मंदिरापर्यत चालत जावे लागत आहे. जेंष्ठ वारकरी, दिव्यांग,गरोदर महिला या भाविकांची ही गैरसोय लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रदक्षिणा मार्ग ते विठ्ठल मंदिर हे अंतर 400 ते 500 मीटर आहे या मार्गावरुन सामान्य भाविकांना वाहने घेवून जाण्यास परवानगी नाही. आता या ई रिक्षांमुळे ज्येष्ठ भाविक व दिव्यांगांची सोय झाली आहे. याचा मोफत लाभ दिला जाणार आहे. दोन रिक्षाची किंमत 9 लाख रूपये आहे. या बॅटरीवर चालणार्या रिक्षा आहेत. याची देखभाल दुरूस्तीही दोन दानशूर भाविक कायमस्वरूपी करणार आहेत. या ई रिक्षा चौफाळा व महाद्वार पोलीस चौकी या ठिकाणी तैनात असणार आहेत.