डीव्हीपीच्या धाराशिव युनिट 3 चे बॉयलर अग्निप्रदीपन, शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्याची अभिजित पाटील यांची घोषणा
पंढरपूर– उसाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर भागात येथील प्रस्थापित साखरसम्राटांचे कारखाने यंदा तरी सुरू होणार का? असा प्रश्न येथील ऊस उत्पादकांना पडला असताना पंढरपूरमध्ये डीव्हीपी उद्योग समुहाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय उभे करणाऱ्या अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात असणाऱ्या धाराशिव साखर कारखान्याच्या युनिट तीनचे सन 2020-21 या गळीत हंगामासाठीचे बॉयलर अग्निप्रदीपन शनिवारी करण्यात आले आहे. दरम्यान तीनही युनिटमध्ये यंदा किमान 11 ते 12 लाख मे. टन ऊस गाळपाचे यंदा उदिष्ट आहे तर शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्याची घोषणा पाटील यांनी केली आहे.
पंढरपूरच्या डीव्हीपी ग्रुप उस्मानाबाद, नांदेड व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक येथे धाराशिव कारखाना युनिट 1, 2 व 3 हे कारखाने चालवत आहे. उस्मानाबाद येथील युनिटचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ नुकताच पार पडला आहे तर शनिवारी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शिवणी येथील धाराशिव साखर कारखाना युनिट 3 च्या दुसऱ्या गळीत हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बॅक नांदेडचे सहव्यवस्थापक भरत पाटील , वसंत शिंदे, श्री. कदम तसेच कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साईनाथ ढोणे व त्यांच्या सुविद्य पत्नीच्या यांच्या हस्ते होम हवन पूजा करण्यात आली.
कोरोनाच्या काळात कर्मचारी, अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कामे करून कारखाना या गळीत हंगामासाठी सज्ज केला आहे. यंदा पाऊसकाळ चांगला झाला असून उसाचे क्षेत्र जास्त असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या उसाच्या नोंदी या कारखान्याकडे कराव्यात. यावर्षी उच्चांकी गाळप करून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देण्याची घोषणा चेअरमन अभिजित पाटील यांनी यावेळी बोलताना केली.यावेळी सर्व संचालक, या भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव, वाहतूक ठेकेदार उपस्थित होते. आभार कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी मानले.
दरम्यान गतवर्षी पंढरपूर तालुक्यातील काही कारखाने बंदच राहिले होते. तेंव्हा अभिजित पाटील यांनी येथील ऊस धाराशिव कारखान्यात नेवून गाळला होता. दरम्यान साखर कारखानदारीत आलेल्या पाटील यांनी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना व्यवस्थित सांभाळत ऊस उत्पादकांना चांगला दर दिला आहे.