तज्ज्ञ पथकाच्या तपासणीनंतरच सिरममधील आगीचे कारण स्पष्ट होईल ; कोविड प्रतिबंधक लसनिर्मिती कार्यक्रम आणि साठा सुरक्षित : उपमुख्यमंत्री

*आग लागलेल्या सिरम इन्स्ट्यिट्यूटच्या इमारतीची अजित पवार यांच्याकडून पाहणी*

मुंबई, दि. २१ :- पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूट इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली असून आगीत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोविडप्रतिबंधक लसनिर्मिती आणि लससाठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही. कोविड लस कार्यक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून उद्या तज्ज्ञांच्या पथकांकडून पाहणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिली.
पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संध्याकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनास्थळी उपस्थित पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार चेतन तुपे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सिरम इन्स्ट्यिट्यूटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोनाप्रतिबंधक लसीमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान मिळवलेल्या सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेली आग व आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या.
आग लागलेल्या इमारतीत अंधार असल्याने रात्री तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे उद्या सकाळी संबंधित तज्ञांच्या पथकांकडून दुर्घटनेतील प्रत्येक मजल्याची तपासणी करण्यात येईल. त्यातून आगीचे कारण स्पष्ट होण्यास मदत होईल, मृतांच्या संख्येबाबत निश्चितपणे सांगता येईल. सदर इन्स्ट्यिट्यूट ‘एसईझेड’ क्षेत्रात असून इन्स्ट्यिट्यूट इमारतीचे फायर ऑडीट, एनर्जी ऑडीट तसेच इतर आवश्यक तपासण्यांची पूर्तता करण्यात आली होती का, याचीही चौकशी करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उद्या सिरम इन्स्ट्यिट्यूटला भेट देणार असल्याची माहिती उपमख्यमंत्र्यांनी दिली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी उत्तम कामगिरी केल्याचे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!