पंढरपूर- उद्या (16 फेब्रुवारी) वसंतपंचमी दिवशी श्री विठ्ठल व रूक्मिणीचा विवाह सोहळा होणार असून कोरोनाविषयक सारे आरोग्याचे नियम यास लागू असणार आहेत. मंदिरात प्रतिवर्षी या विवाह सोहळ्यासाठी भक्तांची गर्दी असते मात्र यंदा मात्र तसे असणार नाही. घरी बसून भाविकांना दूरचित्रवाणीवरून याचा आनंद घ्यावा लागणार आहे. मंदिरे समितीच्या वतीने विवाहाची जय्यत तयारी असून पाच टन विविध फुलांनी मंदिर सजविले जात आहे तर वधूवरांसाठी विवाहाचा पेहराव बंगलोर येथील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सविता चौधरी यांनी डिझाईन करून अर्पण केला आहे.
विठ्ठलासाठी पांढर्या रंगाची अंगी व उपरणे बनविण्यात आले आहे. यावर विष्णूच्या शुभ खुणा असलेला शंख, चक्र व ओम विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोत्याच्या बनविण्यात आले आहे. रुक्मिणी मातेलाही अतिशय उंची सिल्कची कांजीवरम साडी निवडण्यात आली आहे.
पुण्यातील फुल सजावटीची सेवा देणारे भारत भुजबळ हे पाच टन फुलांनी मंदिर सजवित आहेत. थोरियम, विविध रंगी गुलाब, ओर्केड ,जरबेरा, मोगर्यासह 36 प्रकारच्या फुलांचा वापर होत आहे.
कोरोनाचे संकट अजूनही संपूर्णतः संपले नसल्याने या देवाच्या विवाहातही कोरोनाविषयक सर्व आरोग्य नियम पाळले जात आहेत. भाविकांना देवाच्या लग्नाला उपस्थित राहता येणार नाही. असे असले तरी मंदिरात लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. दरवर्षी प्रमाणेच हा विवाह साजरा केला जाणार असल्याचे विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. सध्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रूक्मिणी स्वयंवराची कथा भागवताचार्य अनुराधाताई शेटे सांगत आहेत.