देवेंद्र फडणवीस यांची सलग ५ वर्षाची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द कायम स्मरणात राहणार
प्रशांत आराध्ये
पंढरपूर- मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेली पाच वर्षे जो राज्याचा कारभार केला व त्यांच्या कारकिर्दीत ज्या योजना राबविल्या गेल्या त्या यशस्वी ठरल्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने 2019 ची विधानसभा निवडणूक लढविली व स्पष्ट जनादेश ही मिळविला. मात्र एकत्र लढून ही शिवसेनेशी बिनसल्याने भाजपा सत्तेपासून दूर राहिली आहे हे विसरून चालणार नाही. विरोधकांनी शिवसेनेशी बिघडलेल्या भाजपाच्या संबंधाचा फायदा घेत महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात केला आहे. मात्र असे असले तरी गेली पाच वर्षे यशस्वीपणे काम केलेल्या फडणवीस यांचा कारभार राज्याच्या कायम लक्षात राहिल हे मात्र निश्चित.राज्याला सलग पाच वर्षे एकच मुख्यमंत्री 2014 ते 2019 या कालावधीत लाभला आहे. भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा आशीर्वाद लाभलेल्या व मुळात हुशार असणार्या देवेंद्र फडणवीस यांनी या पाच वर्षात शिवसेनेचे रूसवे फुगवे काढत सरकार यशस्वीपणे चालविले. सुरूवातीला शिवसेनेचा पाठिंबा नसताना ही अल्पमतातील सरकार चालवून दाखविले व नंतर शिवसेनेला बरोबर घेतले. मराठा आरक्षण ,जलयुक्त शिवार असो की शेतकर्यांची कर्जमाफी, रस्ते बांधणी असो की समृध्दी महामार्ग, यास बुलेट ट्रेनसाठी घेतलेला पुढाकार, महानगरांमधील मेट्रो प्रकल्प, शहरांचा विकास यासह ग्रामीण भागासाठी आणलेल्या अनेक योजना यामुळे फडणवीस यांचे काम उठावदार दिसत होते.त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका झाल्या मात्र शिवसेनेला सत्तेत अर्धा वाटा देण्यावरून बिनसले.अडीच वर्षे शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी जर भाजपाने मान्य केली असती तर कदाचित ही महाविकास आघाडी तयारच झाली नसती. अति विश्वास भाजपाला नडल्याचे चित्र आहे तसेच शिवसेनेने देखील सुरूवातीपासून ताठर भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. आता तर युती तुटली आहे. भाजपाने शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना बरोबर घेवून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला खरा पण तो ही अयशस्वी ठरला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी लहान वयातच आपल्या कामाची छाप राज्यात दाखवून दिली आहे. अत्यंत मितभाषी व वेळोप्रसंगी विरोधकांवर तुटून पडणार्या फडणवीस हे आता विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहतील तेंव्हा सत्ताधार्यांवर त्यांचा अंकूश राहणार हे निश्चित आहे. ते मुख्यमंत्री म्हणून आणखी काम करू शकले असते मात्र त्यांनी सतत मी येईन.. मी पुन्हा येईन.. म्हणून विरोधकांबरोबर शिवसेनेला काढलेले चिमटे, शरद पवार यांच्या जिद्दी स्वभावाचा त्यांना न आलेला अंदाज, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी फोन ऐवजी थेट भेट घेवून संपर्क साधण्यात आलेले अपयश व 2014 प्रमाणे अदृश्य हातांकडून चमत्कारांची आशा यामुळे कदाचित ते सत्तेपासून दूर गेले असावेत असे वाटते. ते निवडणुकीत यशस्वी होवून ही मित्रपक्षाशी बोलणी करण्यात अयशस्वी झाले हे मात्र खेदाने म्हणावे वाटते. मात्र फडणवीस ही जिद्दी आहेत व ते यातून ही मार्ग काढून पुन्हा येणारच अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.