देश व राज्याच्या राजकारणाबरोबर पवारांची माढ्यावर बारीक नजर
देशातील प्रमुख राजकीय नेत्यांपैकी एक असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे लोकसभा निवडणुकीच्या देश व राज्यपातळीवरील नियोजनात गुंतले असताना ही त्यांनी माढा मतदारसंघावरील आपली बारीक नजर कायम ठेवली आहे. ते येथून निवडणूक लढविणार हे निश्चित आहे. त्यांनी बहुतेक सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये यासाठी दौरे पूर्ण केले आहेत. मागील आठवड्यात माढा तालुक्यात पवार आले होते तर शुक्रवारी 1 मार्च रोजी त्यांनी करमाळा व माळशिरस तालुक्यात हजेरी लावली.
शरद पवार यांना काँगे्रस प्रणित युपीए मध्ये ही मानाचे स्थान आहे तर सध्या देशपातळीवर तयार होत असलेल्या तिसर्या आघाडीच्या व्यासपीठावर ते दिसून आले आहेत. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असून पुढील आठवड्यात आचारसंहिता लागू शकते व निवडणूक आयोगाने ही निवडणूक प्रक्रिया वेळेतच पूर्ण केली जाईल असे स्पष्ट केले आहे. यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. शरद पवार हे 2009 नंतर पुन्हा माढा लोकसभा मतदारसंघात उभे राहणार हे आता निश्चित झाले आहे. याचे सुतोवाच एक महिन्यापूर्वीच पक्षाकडे झाले होते. पवार यांनी मागील काही दिवसात माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सर्व तालुक्यांचा दौरा केला आहे. सांगोला, फलटण, माढा, करमाळा, माळशिरस मध्ये त्यांचे दौरे झाले आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी येथे सर्व गटातटांशी चर्चा करून त्यांना कामाला लावले आहे. 2009 मध्ये ही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती व लवकर प्रचारास सुरूवात केली. निवडणूक काळात पवार यांना केवळ माढ्यात लक्ष देवून चालणार नाही तर राज्य व अन्य राज्यात ही प्रचारासाठी जावे लागणार आहे. तत्पूर्वी पवार यांनी माढा मतदारसंघातील पक्षा अंतर्गत असणारी गटबाजी कमी करून सर्वांना कामाला लावले आहे.
निवडणूक काळात पवार यांना अन्य पक्षातील मंडळींचे ही सहकार्य होणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नसते. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खांद्यावरच त्यांच्या प्रचाराची धूरा असणार हे निश्चित आहे. पवार यांनी मोहिते पाटील यांच्या जागी जरी आपली उमेदवारी पुढे केली असली तरी ते मोहिते पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करणार यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही. यापूर्वी ही 2009 ला त्यांनी राज्यसभेवर रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी दिली होती व नंतर विजयसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेवर घेतले होते.
पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा पाया भक्कम असून तो कायम ठेवण्यासाठी पवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी माढा मतदारसंघात दौर्याची एक फेरी पूर्ण केली आहे. मागील आठवड्यात पवार हे माढा तालुक्यात असताना भाजपाचे सहयोगी व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले होते. पवार व शिंदे यांचे जुने संबंध आहेत. आज ते करमाळ्यात गेले व तेथे संजय शिंदे यांना करमाळ्यात विरोध करणार्या बागल गटाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. सर्व गटातटांना बरोबर घेवून आपली निवडणूक पार पाडण्याची कसब पवार यांना ठाऊक असल्याने ते योग्य वेळी कानपिचक्या देतात. यामुळेच त्यांना विरोध करण्याची अनेकांची हिंमत होत नाही. यामुळेच पवार यांच्या व्यासपीठावर सारे एकत्र येतात.