” दो आँखे बारह हाथ ” मुळे जगविख्यात झालेल्या आटपाडीतील कैद्यांची खुली वसाहत स्वतंत्रपूरचा विकास करण्याची मागणी
आटपाडी दि . १० – सांगली जिल्ह्यातील आटपाडी जवळील स्वतंत्रपूर कैद्यांच्या खुल्या वसाहतीसह परिसराचा विकास, विस्तार आणि कालानुरूप परिवर्तन करा , अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे .
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील ,गृहराज्यमंत्री( ग्रामीण) शंभूराजे देसाई, गृहराज्यमंत्री( शहरे ) सतेज डी.पाटील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील , सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दतात्रय भरणे, प्रधान सचिव विधी व न्याय विभाग ,गृह सचिव गृह विभाग , तुरुंग महासंचालक,पोलीस महासंचालक यांना ईमेल व पोस्टाने निवेदन पाठविण्यात आली आहेत.
आटपाडी शहरालगतचे स्वतंत्रपूर या कैद्यांच्या मुक्त वसाहतीत जन्मठेपेतील कैद्यांना अंतिम काही वर्षे त्याच्या परिवारासह ठेवून शेतीच करून घेतली जाते . १९३७ – ३८ साली महात्मा गांधीजीच्या संकल्पनेतून तत्कालीन औंध संस्थानचे अधिपती बाळासाहेब उर्फ भवानराव पंतप्रतिनिधी , इंग्लडचे माजी राजदूत बॅरिस्टर आप्पासाहेब पंतप्रतिनिधी आणि फ्रेंच अभियंता भारतानंद उर्फ मॉरीस फ्रीडमन यांनी या स्वतंत्रपूर वसाहतीची रचना केली. दो आँखे बारह हाथ या चित्रपटाच्या कथानकाचे मूळ उगम ठरलेले वसाहतीचे पहिले जेलर अब्दुल अजीज अब्दूल खालील काझी मास्तरांच्या प्रेम, खडतर श्रमाच्या तपश्चर्येतून या वसाहतीला त्याकाळी नवे आयाम मिळाले होते आणि महाराष्ट्र शासन या एका अजोड कल्पनेला टिकवून जन्मठेपेतील कैद्यांना अंतिम वर्षामध्ये शेती करून स्वतःच्या पायावर उभे रहायची संधी देते . ही संकल्पना म्हणजे काय हे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक व्ही . शांतारामबापू आणि चित्रपट कथाकार ग.दि.माडगूळकर यांच्या *दो आँखे बारह हाथ* मधून आपणांस समजू शकेल .
गेली ८० वर्षे सुरु असलेल्या या उपक्रमाला अधिक विस्तारण्याची वेळ आलेली आहे .त्यासाठी या भागातला नागरिक म्हणून आपण काही उपाय सुचवित आहे . त्याचा विचार व्हावा,असे सादिक खाटीक यांनी म्हटले आहे.पुरुष कैद्याप्रमाणेच जन्मठेपेतील महिला कैद्यानांही शेवटची दोन वर्षे इथे सहपरिवार वास्तव करण्याची स्वतंत्र सोय करावी . तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी महिलांची स्वतंत्र व्यवस्था येथे नसल्याने याबाबताच्या उपक्रमास स्थगिती दिली होती.
नाशिक मधील बाल गुन्हेगारांच्या बोस्टन सुधारगृह शाळेप्रमाणे स्वतंत्रपूर मध्येही बाल सुधारगृहाची वेगळी व्यवस्था करावी . दोन ते पाच वर्षे शिक्षा झालेल्या तरुण आणि तरुणी कैद्यांना नर्सिंग सारख्या कोर्सची व्यवस्था करून त्यांना कमवा आणि शिका ही योजना लागू करावी . शासनाच्या अत्यावश्यक आणि साथ नियंत्रण विभागामध्ये या सिस्टर आणि ब्रदर्सना शिक्षेनंतर नोकरीची तरतूद करावी . किमान ५०० जणांना एका वेळेस शिक्षित करता येईल इतकी प्रशस्त प्रशिक्षण यंत्रणा स्वतंत्रपुराची नवी ओळख बनावी .या सर्व सोयींचा फायदा आटपाडी तालुक्यातील सामान्य कुटुंबातील मुले, महिला, युवक, युवती यांनाही मिळावा . यासाठी २० टक्के जागा स्थानिक जनतेसाठी राखून ठेवाव्यात . त्यांना ते कैदी नसले तरी या सुविधा देण्यात याव्यात . या सर्व प्रकल्पांसाठी स्वतंत्रपूर वसाहती शेजारी शेकडो एकर डबई कुरणाची जमीन उपलब्ध आहे. जवळपास २५० एम.सी.एफ.टी.चा आटपाडी तलाव आहे . हा तलाव २ टी.एम. सी. क्षमतेचा करण्याइतपत वाव आहे. त्यामुळे स्वतंत्रपुरात ,जवळ हे उपक्रम राबविण्यासाठी जमीन आणि पाण्याची कोणतीही कमरता भासणार नाही . स्थानिक आमदार अनिलराव बाबर यांच्या प्रयत्नातून दोन कोटी रुपये खर्चाच्या २८ खोल्यांची निर्मिती केली गेली आहे .या मानवतावादी संस्कार केंद्रासाठी राज्य सरकारने तातडीने १०० कोटी रुपये उपलब्ध करून जागतिक उंचीचे परिवर्तन साकारावे .
महाराष्ट्र शासन प्रत्येक जिल्ह्यातील जेलचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांना बऱ्याचदा जागेचा प्रश्न भेडसावतो . मात्र कैद्यांमध्ये सामाजिक ,कौटुंबिक वादातून झालेले गुन्हे आणि गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्ती , टोळ्यांनी केलेले गुन्हे असे दोन भाग केले तर किमान सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील कौटुंबिक,सामाजिक गुन्हयातील आरोपी , प्रोफेशनल ( सराईत ) गुन्हेगारांपासून वेगळे करून त्यांचे जीवनमान सुधारता येईल. आजच्या घडीला जेलमध्ये गेलेला सामान्य व्यक्तीही बाहेर आल्यानंतर काही अपवाद वगळता अधिक मोठा गुन्हेगारच होत आहे . यातून समाजातल्या या नकळत गुन्हेंगार बनलेल्यांना सुधारणेच्या प्रक्रियेत आणण्यास मदत करणाऱ्या या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार व्हावा आणि निर्णायक पाऊल टाकले जावे अशी अपेक्षाही सादिक खाटीक यांनी व्यक्त केली आहे .