नव्वदीच्या बेवारस आज्जीचा सत्कार करून महिला दिन साजरा
पंढरपूर- जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा नेहमी सन्मान केला जातो. परंतु येथील महर्षी वाल्मीकी संघाने चंद्रभागा वाळवंटातील एका बेवारस नव्वद वर्षाच्या आज्जीचा सत्कार केला व तिला गोडधोड जेवण भरविले. वयाच्या नव्वदीत या वृध्द मातेस येथे बेवारस सोडण्यात आले आहे. तिने ही करारी बाणा जपत आपल्या नशिबी आलेले जगणं स्वीकारल असून ती येथे वाळवंटात भिक्षा मागून उदरनिर्वाह करते.
याविषयी बोलताना महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, आयुष्याच्या उत्तरार्धात थकलेल्या शरीराची ही आज्जीबाई मनानं खंबीर राहून ताठ मानेनं जगतेय. खर्या अर्थाने या आज्जीबाईंच्या संघर्षमय जीवनातून बरच काही शिकण्यासारखं आहे. आलेल्या अडचणींचा खंबीरपणे सामना त्या करत आहेत. ऐन म्हातारपणी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना आपल्या वारसांनी असं बेवारस करू नये असे आवाहन ही अंकुशराव यांनी केले आहे. यावेळी चंद्रभागेच्या वाळवंटातील इतरही अनेक बेवारस महिलांचा सत्कार करण्यात आला व शासनाने या या भगिनींची नोंद करुन यांच्या उदरनिर्वाहासाठीची ठोस उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी गणेश अंकुशराव, पुंडलिक परचंडे, सूरज कांबळे, संपत सर्जे, जयवंत अभंगराव, बाबासाहेब अभंगराव, उमेश तारापूरकर, अरुण कांबळे, गणेश कांबळे, सचिन अभंगराव, दीपक कोरे, बट्टेश्वर अभंगराव, कुमार संगीतराव, संतोष तावस्कर, आण्णा माने, शरद कोरे यांच्यासह महिला भगिनी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.