निंबाळकरांच्या भाजपाप्रवेशावेळी मोहिते व महाआघाडीचे परिचारकांसह अन्य नेते उपस्थित
माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून त्यांचा सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह महाआघाडीचे नेते आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत व शहाजीबापू पाटील ही उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना तिकिट दिले असून ते महाआघाडीचे निमंत्रक आहेत. यामुळे या आघाडीच्या अन्य नेत्यांची भूमिका काय असणार ? याकडे सार्यांचे लक्ष होते.
जिल्ह्यात जी भाजपाच्या पाठिंब्याने महाआघाडी तयार करण्यात आली होती ती मुळात मोहिते पाटील यांच्या विरोधात होती. आता रणजितसिंह मोहिते पाटील हेच भाजपात आल्याने महाआघाडीतील नेत्यांसमोर पेच निर्माण झाला होता. संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी घेतली. यानंतर त्यांचे परममित्र प्रशांत परिचारक व अन्य नेत्यांकडे सार्या जिल्ह्याचे व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष होते. आमदार परिचारक यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचा प्रचार सुरू केला आहे. तर शहाजीबापू पाटील यांनी ही आपण भाजपासोबतच राहणार असल्याची ग्वाही दिली आहे.
आज भाजपाच्या व्यासपीठावर मोहिते , परिचारक, राऊत व पाटील ही सारी मंडळी एकत्र आल्याचे चित्र होते. सोमवारी सकाळी सोलापूर येथे ही भाजपा उमेदवार डॉ.जयसिध्देश्वर महाराज यांच्या अर्ज भरण्याच्या रॅलीत आमदार प्रशांत परिचारक व धैर्यशील मोहिते पाटील एकत्र दिसले होते. 2009 पूर्वी मोहिते पाटील व पंढरपूरचे परिचारक यांच्यातील मैत्री घनिष्ठ होती मात्र नंतर राजकीय स्पर्धा सुरू झाली. विजयसिंह मोहिते पाटील व सुधारकपंत परिचारक यांनी जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षे एकत्र काम केले आहे.