नेते निवडणुका व राजकारणात मस्त.. महागाईमुळे बजेट कोलमडल्याने जनता त्रस्त..!
पंढरपूर– इंधन दरवाढीचा नवा उच्चांक सध्या सर्वत्र आहे. डिझेलचे दर गगनाला भिडल्याने सहाजिकच वाहतूक महागली व साऱ्या वस्तूंच्या किंमती वाढू लागल्या आहेत. कोरोनाच्या संकटातून सर्वसामान्य माणूस बाहेर पडत असताना महागार्इच्या खार्इत तो लोटला जात आहे. दरम्यान देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी व विरोधक गुंतले आहेत. राजकारणाचा ऊत आला आहे मात्र सामान्य जनता मात्र महिन्याचे बजेट कोलमडल्याने त्रस्त झाली आहे.
घरगुती गॅसच्या किंमती 1 डिसेंबर 2020 पासून 225 रूपयांनी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे खाद्यतेल आणि डाळींचे दर गेल्या 15 दिवसांत प्रति किलो 10 ते 15 रुपयांची वधारले. खाद्यतेलाच्या किंमती रोज वाढत चालल्या आहेत. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे बेरोजगार, वेतन कपात झालेल्या नोकरदारांना आता महागाईचे हे चटके नकोसे झाले आहेत. महागाईवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही असाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असून सरकारने महागाई कमी करावी अशी मागणी होत आहे.