नैसर्गिक आपत्तीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या दोन दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

सोलापूर, दि.14- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दि. 14 व 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा नैसर्गिक आपत्तीमुळे पुढे ढकलल्या असून त्या परीक्षा अनुक्रमे दि. 19 व 20 ऑक्टोबर रोजी पूर्व नियोजित वेळेनुसार होतील, अशी माहिती परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात दमदार पाऊस पडत असून यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेला आहे. त्याचबरोबर हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देखील सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. ऑनलाइन परीक्षेदरम्यान नेटवर्क व खंडित वीज पुरवठा यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, या कारणाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून दोन दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. 14 व 15 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा या अनुक्रमे दि. 19 व 20 ऑक्टोबरची होतील.

दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांना पुढे परीक्षा देण्याची गरज नाही. जर त्यांनी लॉगिन करून परीक्षा दिलेली नाही, त्यांना मात्र परीक्षा द्यावी लागणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हा निर्णय घेतलेला असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!