पंढरपुरात एकाच दिवशी 8 जणांची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात घरी सोडले
पंढरपूर ,09– जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना. रुग्ण बरे होण्याची प्रमाण देखील वाढत आहे. पंढरपूरातील वाखरी येथील एमआयटी कोविड केअर सेंटर येथून आज 9 जुलै रोजी आठ जणांनी कोरोनावर मात केली असून, टाळ्यांच्या गजरात त्यांना घरी सोडण्यात आले.
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एमआयटी कोविड सेंटर येथे उपचारासाठी आतापर्यत 32 कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एमआयटी कोविड केअर सेंटर येथून आठ रुग्ण यापूर्वी घरी सोडण्यात आले होते. त्यातील 25 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते त्यातील आठ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यत 16 जणांना घरी सोडण्यात आले असून ,कोविड केअर सेंटर येथे कोरोना बाधित 17 रुग्णांवर योग्य उपचार सुरु असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
परराज्यातून व परजिल्ह्यातून रेडझोनमधून आलेल्या नागरिकांमुळे तालुक्यात संक्रमणाचा धोका निर्माण झाला होता. आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन विभागाने तालुक्यातील परस्थिती समन्वायाने हाताळून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चांगल्या पध्दतीने केले. त्यामुळे येथील स्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली असल्याचे श्री ढोले यांनी सांगितले. नागरिकांनी स्वच्छता, मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे आदी प्रतिबंधात्मक उपयांची अंमलबजावणी करुन, आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असे, आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.
पंढरपूर तालुक्यात गजानन महाराज मठ, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आणि वाखरी कोविड केअर सेंटर येथे स्वॅब घेण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच रॅपिट अँटिजेन टेस्टच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी सांगितले. तालुक्यात आतापर्यंत 900 जणांची कोरोना चाचणीची तपासणी केली आहे. त्यामध्ये 166 तपासणी अहवाल प्रलबिंत आहेत.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे, आवाहनही तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी केले आहे.
वाखरी येथील कोविड केअर सेंटर येथे कोरोनामुक्त झालेल्या 8 जणांना निरोप देण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.प्रदिप केचे, डॉ. धनंजय सरोदे, तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.