पंढरपुरात मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु, प्रतिक्विंटल १७६० ₹ दर
पंढरपूर,दि.17 – मका शेतमालाला हमी मिळावा यासाठी पंढरपूर व सांगोला या तालुक्यासाठी शासन हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
शासकीय गोदाम पंढरपूर हमीभाव केंद्राचे उद्घाटन सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार वैशाली वाघमारे, सहाय्यक निंबधक सहकार एस.एम.तांदळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शांतिनाथ बागल उपस्थित होते.
शासन दरवर्षी विविध प्रकारच्या शेत मालाला किमान आधारभूत किंमत जाहीर करत असते. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार महाराष्ट्र शासन व मार्केटिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मका हमी भाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. मका पिकाला प्रति क्विंटल 1760 रुपये हमीभाव देण्यात आहे. पंढरपूर तालुका खरेदी विक्री संघाकडे पंढरपूर व सांगोला तालुक्यातील 10 हजार क्विंटल मका विक्रीसाठी शेतकर्यांनी नोंद केली असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मका हमीभाव केंद्रावर सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच मका खरेदी केंद्रावर मका उत्पादक शेतकर्यांनी जास्तीत-जास्त मका शेतीमाल विक्रीस आणून हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.
शेतकर्यांनी मका खरेदी केंद्रावर स्वच्छ माल आणणे आवश्यक आहे. यासाठी शेतकर्यांनी खरेदी विक्री संघाकडे नोंदणी करण्यासाठी मका पीक पेरा असलेला 7/12 चा उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स कागदपत्रे आवश्यक असल्याची माहिती सहाय्यक निंबधक सहकार एस.एम. तांदळे यांनी दिली.