पंढरपूर – कोरोनाचा संसर्ग झालेले जे पाचजण वाखरी येथील एमआयटी संस्थेतील तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होते ते आता कोरोनामुक्त झाले असून त्यांना सोमवारी घरी पाठविण्यात आले. यावेळी प्रशासकीय व वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली तर उपस्थितांनी श्री विठ्ठलाचा जयघोष केला. दरम्यान पंढरपूर शहर व तालुक्यातील ७ पैकी सहा जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
कोविड 19 चा प्रादुर्भाव सर्वत्र असून पंढरपूर तालुक्यात ही याचे सात रूग्ण आढळून आले होतेे. यापैकी २ जणांवर सोलापूरला तर ५ जणांवर वाखरीत उपचार सुरू होते. सोलापूर च्या रूग्णालयातून १जण घरी परतला आहे. तर १ जणांवर तेथे उपचार सुरु आहेत. वाखरीतील ५ जणांना आज डिसचार्ज मिळाला. मुंबई व पुण्यासारख्या कोविड 19 रेडझोन मधून हे सर्व पंढरपूर तालुक्यात आले होते. यातील पाच जणांवर शहराशेजारील वाखरी येथील एमआयटी संस्थेत उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. हे पाच ही जण आता कोरोनामुक्त झाले असून त्यांना सोमवारी या सेंटरमधून घरी पाठविण्यात आले आहे. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मोनोरकर यासह वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांच्यासह उपचार करणारे डॉक्टर्स, स्फाफ व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी कोरोनामुक्त झालेल्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.. श्री ज्ञानदेव तुकाराम..पंढरीनाथ महाराज की जय..चा जयघोष केला.
दरम्यान याबाबत माहिती देताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले म्हणाले की, वाखरी येथे उभारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये आतापर्यंत आतापर्यंत कोविड 19 चे पाच रूग्ण दाखल होते. या पाच ही जणांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. शहर व तालुक्यातील फ्ल्यू सदृष्य ताप तसेच कोविड 19 रूग्णाच्या संपर्कातील जवळपास 111 जण उपचारासाठी या सेंटरमध्ये दाखल करून घेण्यात आले आहेत आतापर्यंत या कोविड केअर सेंटरमध्ये 250 जणांचे स्वॅब नमुने आरोग्य विभागाच्या वतीने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहे.
दरम्यान पंढरपूर परिसरात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी येथील प्रशासकीय यंत्रणेने खूप प्रयत्न केले होते. मात्र लॉकडाऊन काळात जेंव्हा शासनाने नागरिकांना घरी परतण्यास परवानगी दिली तेंव्हा पुणे व मुंबईसारख्या रेडझोनमधून अनेकजण पंढरीत आले होते. यातील बहुतांश लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय येथील अधिकार्यांनी घेतला होता. वाखरीच्या कोविड केअर सेंटरमधून ज्यांना आज घरी पाठविण्यात आले आहे ते सर्व संस्थात्मक विलगीकरणात होते.