पंढरपूर– सोलापूर जिल्हा ग्रामीणचा कोरोनामुक्तीचा दर सरासरी 77 टक्के असला तरीक्षसर्वाधिक रूग्ण संख्या नोंदल्या गेलेल्या पंढरपूर तालुक्याचा हाच दर 84% इतका आहे ही दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे. पंढरपूर तालुक्याचा कोरोना मृत्यूदर 2.48 टक्के आहे तर जिल्हा ग्रामीणचा 2.71 टक्के आहे.
पंढरपूर तालुक्याने शनिवार 03 ऑक्टोंबर रोजी कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येची पाच हजार संख्या पार केली आहे. येथील आकडा 5037 इतका झाला आहे. मात्र प्रत्यक्षात उपचार सुरू असणारी रूग्ण संख्या 680 इतकीच आहे. तर 4232 जणांनी आजवर कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तीची टक्केवारी 84 टक्के इतकी होते.
सोलापूर जिल्ह्याची एकूण रूग्ण संख्या 26 हजार 49 असून आजवर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आहे 20 हजार 149. याची टक्केवारी 77.35 टक्के होते. तर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनामुळे 707 जणांनी आजवर प्राण गमावले आहेत. ग्रामीणचा मृत्यूदर हा 2.71 टक्के होतो. पंढरपूर तालुक्यात 125 जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. या तालुक्याची मृत्यूदर टक्केवारी 2.48 इतकी आहे.