पंढरपूर – पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाची भूमिका काय असणार? याकडे सार्यांचे लक्ष असून येथे या पक्षाला आजवर कधीही विजय मिळालेला नाही. यातच ही पोटनिवडणूक असून मतदारांची सहानभूती आमदार कै. भारत भालके यांच्या कुटुंबीयांना मिळणार हे निश्चित दिसत आहे. सध्या राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असल्याने त्यांच्याविरोधात भाजपा पंढरपूरमध्ये लढून पराभूत झाल्यास राज्यभरात याची चर्चा होत राहणार व शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीला आयता मुद्दा मिळणार आहे. यामुळेच वरिष्ठ ते स्थानिक पातळीपर्यंत सारेच नेते शांत असावेत असे वाटते.
कै. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून ही जागा राष्ट्रवादीची आहे. पोटनिवडणुकीमुळे पुढील साडेतीन वर्षासाठी येथून आमदार निवडला जाईल. यापूर्वी राज्यात जेंव्हा विद्यमान आमदारांचे निधन झाले आहे तेंव्हा त्यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली जाते व ते सहज विजयी होतात हा अनुभव आहे. यात अनेकदा विरोधी पक्ष देखील उमेदवार देत नाहीत असेही दिसून आले आहे. आमदार कै. भारत भालके यांनी पंढरपूर मतदारसंघाचे सलग तीनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांना 2019 मध्ये जनतेने पाच वर्षासाठी निवडून दिले होते. एकच वर्षात त्यांचे निधन झाल्याने आता पोटनिवडणूक होत आहे.
राष्ट्रवादी असो की भाजपाच्या वरिष्ठ ते स्थानिक पातळीवर सध्या पोटनिवडणुकीबाबत फारशी चर्चा होताना दिसत नाही. माध्यमांमधूनच येथील रणधुमाळीची चित्र रंगवली जात आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी नक्कीच प्रयत्न येत्या काही दिवसात केले जातील यात शंका नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा होत ही असणार ..हे स्थानिक पातळीवर समजणे कठीण आहे. यातच राष्ट्रवादीचे राज्यात काम पाहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरूवातीपासूनच चांगला ताळमेळ असल्याचे आजवर दिसून आले आहे.
भारतीय जनता पक्ष असो की यापूर्वीची महायुती..त्यांना 2009 पासून पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात तीनही वेळा पराभव पत्करावा लागला आहे. लोकसभेला सोलापूरला जोडलेल्या या भागात भाजपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा होतो मात्र विधानसभेला हा भाग नेहमी काँग्रेसी विचारसरणीची पाठराखण करताना दिसतो. यातच ही पोटनिवडणूक असून यात भालके कुटुंबाला मोठ्या प्रमाणात सहानभूती मिळणार हे निश्चित आहे. यामुळे कदाचित भाजपाच्या गोटात शांतता असावी असे दिसते. जर भाजपाने या निवडणुकीत उमेदवारच दिला नाही तर त्यांची प्रतिमा आणखी उजळू शकते तसेच या पक्षाप्रती जनतेच्या मनात आदर वाढू शकतो. असाही एक मतप्रवाह आहे.
जरी प्रमुख विरोधी पक्षाने यात उमेदवार दिले नाहीत तरी पोटनिवडणूक बिनविरोध होईल असे सांगता येत नाही. कारण काही मातब्बर नेते येथून अपक्ष देखील लढू शकतात. अशावेळी पडद्यामागून ज्याला कोणाला खेळ्या करायच्या आहेत त्यांनाही ही आयती संधी मिळू शकते. यातच राज्यातील तीन पक्षाचे सरकार फार काळ टिकणार नाही अशी चर्चा सतत होत असते. कदाचित तसेच घडले व पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्याची वेळ आली तर पुन्हा लढावेच लागेल व पाच वर्षात तीन तीन निवडणुका लढविणे कोणाला परवडणार हा देखील मोठा प्रश्न आहे? असा विचार अनेक नेते सध्या करत असण्याची दाट शक्यता आहे. यामुळेच स्थानिक पातळीवर शांतता दिसून येते. भाजपाचे स्थानिक नेते आमदार प्रशांत परिचारक यांनीही या पोटनिवडणुकीबाबत जाहीर वाच्यता केलेली नाही. त्यांचे पुतणे प्रणव यांनी भाजपा पदाधिकारी निवडीच्या वेळी आपण निवडणूक लढू असे सांगितले होते. मात्र नंतर पुन्हा काहीच हालचाली दिसल्या नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या दोन दिवसात या पोटनिवडणुकीबाबतचे निर्णय घेतील. कदाचित त्यांचा पंढरपूर दौरा होण्याची शक्यता आहे. येथे जोवर राष्ट्रवादी व भाजपाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत नाहीत तोवर सार्याच बाबी शक्यता म्हणूनच गणल्या जातील.