पंढरपूरच्या पोटनिवडणुकीसाठी कोविड रुग्ण , दिव्यांग व ऐंशी वर्षावरील नागरिकांना टपालाव्दारे मतदान करता येणार
पंढरपूर, दि. 19:- विधानसभेच्या पंढरपूर मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी कोविड रुग्ण, दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरिकांना टपालाव्दारे मतदान करता येईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे सांगितले. त्याचबरोबर मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते संध्याकाळी 7.00 वाजेपर्यंत असणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंढरपूर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांची बैठक झाली. त्यानंतर श्री.देशपांडे यांनी ही माहिती दिली. श्रीयश पॅलेस, कोर्टी रोड, पंढरपूर येथे बैठक झाली. बैठकीस सह मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना.वळवी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. देशपांडे यांनी सांगितले की, ‘निवडणूक कोरोनाच्या कालावधीत होत असल्याने आव्हानात्मक आहे. मात्र याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोपणे पालन करुन निवडणूक पार पाडली जाईल. मतदान केंद्रावर कोरोनाबाबत पुरेपुर काळजी घेतली जाणार आहे. आरोग्य पथक तैनात केले जाणार आहेत. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर त्यांना कोरोना प्रतिबंधिक लस दिली जाणार आहे’.
तत्पूर्वी, निवडणूकीचे काम काटेकोरपणे व्हावे यासाठी सर्व अधिकारी आणि विभागांनी नेमून दिलेले काम करावे अशा सूचना श्री. देशपांडे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. पाच आणि पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र असणाऱ्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. तेथे अधिकचा कर्मचारी वर्ग नियुक्त करावा अशा सूचना श्री. देशापांडे यांनी केल्या. वाढलेल्या मतदान केंद्रावर सूक्ष्म निरिक्षकांच्या नियुक्तीची आणि त्यांच्या प्रशिक्षणाची कार्यवाही करावी. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जागृतीसाठी अभिनव कल्पनांचा वापर करावा , असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राजकीय पक्षांनी लोकांना आवाहन करावे. निवडणूक पारदर्शी आणि भयमुक्त वातावरणात होण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. देशपांडे यांनी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत केले. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, स्वप्निल मरोड, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक रवींद्र आवळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.