पंढरपूर- मंगळवारी वसंतपंचमी दिवशी श्री विठ्ठल व रूक्मिणीचा विवाह सोहळा पंढरपूरमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
दुपारी वाजता श्री विठ्ठल रखुमाई यांचा विवाह सोहळा झाला. मंदिरे समिती सह अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनीही देवाच्या लग्नात मंगल अष्टका म्हंटल्या. व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिरातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली होती.
कोरोनाविषयक सारे आरोग्याचे नियम या सोहळ्यास लागू असल्याने मोजके लोक यासाठी हजर होते. घरी मंदिरे समितीच्या वतीने विवाहाची जय्यत तयारी करण्यात आली होती. पाच टन विविध फुलांनी मंदिर सजविले गेले होते. तर वधूवरांसाठी विवाहाचा पेहराव बंगलोर येथील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सविता चौधरी यांनी डिझाईन करून अर्पण केला आहे.
श्री विठ्ठलासाठी पांढर्या रंगाची अंगी व उपरणे बनविण्यात आले आहे. यावर विष्णूच्या शुभ खुणा असलेला शंख, चक्र व ओम विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोत्याच्या बनविण्यात आले आहे. रुक्मिणी मातेलाही अतिशय उंची सिल्कची कांजीवरम साडी निवडण्यात आली आहे.
पुण्यातील फुल सजावटीची सेवा देणारे भारत भुजबळ हे पाच टन फुलांनी मंदिर सजविले होते.यात थोरियम, विविध रंगी गुलाब, ओर्केड ,जरबेरा, मोगर्यासह 36 प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.
कोरोनाचे संकट अजूनही संपूर्णतः संपले नसल्याने या देवाच्या विवाहातही कोरोनाविषयक सर्व आरोग्य नियम पाळले गेले. या विवाह सोहळ्यानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रूक्मिणी स्वयंवराची कथा भागवताचार्य अनुराधाताई शेटे यांनी सांगितली.