पंढरपूर तालुका : ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता

पंढरपूर, – तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी चुरशीने 84.87 टक्के झाले असून याची मतमोजणी आता सोमवार 18 रोजी होत आहे. येथे केवळ एक ग्रामपंचायत बिनविरोध निवडली गेली आहे. करकंब, कासेगाव, चळे, भाळवणी व अन्य मोठ्या गावातील निकालांकडे केवळ पंढरपूरचे नाही तर हा तालुका ज्या चार विधानसभाक्षेत्रात विभागला गेला आहे तेथील नेत्यांचेही लक्ष लागले आहे.

पंढरपूर तालुका माढा, सांगोला, मोहोळ व पंढरपूर- मंगळवेढा या चार विधानसभा क्षेत्रात विखुरला आहे. यामुळे ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात चार मतदारसंघातील आमदार तसेच अन्य पक्षातील राजकीय नेतेमंडळींचे येथील गावांवर लक्ष असते. पंढरपूर तालुक्यात 71 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने यास मिनी विधानसभा म्हणूनच संबोधले जाते.

येथील अनेक गावांनी निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र जैनवाडी ही एकमेव ग्रामपंचायत संपूर्णतः बिनविरोध झाली आहे. तर अन्य गावांमध्ये 75 सदस्य हे बिनविरोध निवडले गेले आहेत. येथील ग्रामपंचायत रणधुमाळीत 1 हजार 657 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. 15 जानेवारी रोजी मतदान होवून चुरशीने 84.87 टक्के ते नोंदले गेले आहे. तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरविणार्‍या मोठ्या गावांमध्ये या निवडणुकीचा उत्साह मोठ्या प्रमाणात जाणवून आला आहे. करकंब, कासेगाव, वाखरी, चळे, भाळवणी, भंडीशेगाव, भोसे, सुस्ते, उपरी, तावशी, रोपळे, बोहाळी, तारापूर, अनवली, आंबे, खर्डी, तिसंगी ,कौठाळी, पिराची कुरोली, गादेगाव, गोपाळपूर, पटवर्धन कुरोली, बाभुळगाव, तपकिरी शेटफळ यासह निवडणूक होत असलेल्या सर्वच गावांमध्ये चुरशीने मतदान झाले आहे.

71 ग्रामपंचायत निवडणुकीत जवळपास 1 लाख 66 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. येथील निवडणुका या स्थानिक पातळीवर गटातटाच्या राजकारणावर अवलंबून असतात. येथील परिचारक, भालके व काळे गट या निवडणुकीत ताकदीने उतरलेले दिसत होते. याच बरोबर शेजारच्या मंगळवेढा तालुक्यातील समाधान आवताडे गटाने ही पंढरपूर विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या गावांमध्ये ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक पातळीवर समविचारी नेते एकत्र येवून आघाड्या बनवून निवडणूक लढविताना दिसत होते. दरम्यान तालुक्याच्या राजकारणातील प्रमुख तीन गटांचे जे नेते आहेत त्यांच्या गावातही म्हणजे खर्डी, वाडीकुरोली व सरकोलीतही निवडणूक पार पडली आहे. याचे निकाल आता सोमवारी दुपारपर्यंत हाती येतील.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या निवडणुकीत कार्यकर्ते व मतदारांचा उत्साह कमी झालेला दिसत नव्हता. तालुक्यात केवळ एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!