विठ्ठल कारखाना निवडणूक लढविण्याची युवराज पाटील यांची घोषणा , विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही इच्छुक

पंढरपूर– विधानसभेची पोटनिवडणूक व विठ्ठल कारखान्याची निवडणूक आगामी काळात होत असताना पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बऱ्याच उलाथापालथ होवू लागल्या आहेत. कालच ॲड.दीपक पवार यांना तालुकाध्यक्षपदावरून दूर केल्याचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले असून विठ्ठल हॉस्पिटल येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पवार यांना पुन्हा तालुकाध्यक्षपद मिळेपर्यंत मागे न हटण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे येणारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक स्व. औदुंबरआण्णा पाटील व स्व.यशवंतभाऊ पाटील यांच्या विचारावर स्वतंत्रणपणे लढण्याचे संकेत युवराज पाटील यांनी दिले. यामुळे पंढरपूर तालुक्याच्या चांगलीच खळबळ उडाली आहे.
येणाऱ्या पोटनिवडणुकीत पंढरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युवराजदादा पाटील यांना उमेदवारी दिली जावी अशी मागणी काहीजणांनी यावेळी केली. तर आपण ही लढण्यास इच्छुक असल्याचे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. तर ॲड. दीपक पवार यांना परत तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्षपद द्यावे यासाठी समर्थन जाहीर करण्यात आले. पुन्हा पवार यांना अध्यक्षपद मिळवून देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटून माहिती दिली जाणार आहे.
आमदार कै. भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी देखील कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी अध्यक्षपदावर दावा सांगितला होता. नंतर झालेल्या चर्चेत त्यांनी भगीरथ भालके यांना चेअरमन करण्यास संमती दिली. दरम्यान ॲड. पवार यांना तालुकाध्यक्षपदावरून काढल्यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. सोमवारी 1 मार्च च्या विठ्ठल हॉस्पिटलच्या आवारात जमलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना युवराज पाटील यांनी आपण ॲड. दीपक पवार व युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांना बरोबर घेवून विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. आपला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अथवा राष्ट्रवादीला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही पहिल्यापासून शरद पवार साहेबांबरोबरच आहोत. आजवर त्यांच्यासाठीच काम करत आहोत.कधीही त्यांना सोडून इतर पक्षात गेलो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!