पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार पाहूनच भाजपा आपले पत्ते उघडण्याची शक्यता ; चुरशीच्या लढतीची तयारी

पंढरपूर, – पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून भालके कुटुंबातच उमेदवारी दिली जाणार हे निश्‍चित असले तरी तिकिट भगिरथ भालके यांना की त्यांच्या मातोश्री जयश्रीताई यांना, याबाबत अद्याप पक्षाने काहीच जाहीर केलेले नाही. यामुळे विरोधक असणार्‍या भाजपानेही आपला उमेदवार आजपर्यंत निश्‍चित केला नसल्याची चर्चा आहे.
भारतीय जनता पक्षाकडून अनेक नावांची चर्चा सध्या आहे. यात विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, मागील दोन निवडणुका शिवसेना व अपक्ष म्हणून लढलेले व चांगली मते घेतलेले समाधान आवताडे यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र जर राष्ट्रवादी आमदार कै. भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी दिली तर भाजपाकडूनही महिला उमेदवार दिली जावू शकते. यासाठी ऐनवेळी निर्णय होवू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारीबाबत कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून गेले आहेत. तर दुसरीकडे भगिरथ भालके यांनी प्रचारासाठी जनसंपर्क अभियान सुरू देखील केले आहे.
पंढरपूरची पोटनिवडणूक ही इतकी चुरशीची होवू शकेल असा अंदाज नव्हता. कोरोनाचा वाढता प्रभाव , तीव्र उन्हाळा असतानाही पोटनिवडणुकीत चांगलाच रंग भरू लागला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी व काँगे्रसची ताकद चांगली आहे. याच जोरावर आजवर येथे सतत याच पक्षांना यश मिळत आले आहे.
दरम्यान ही पोटनिवडणूक राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसाठीही परीक्षा ठरणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होवून दोन दिवस झाले तरी अद्यापही त्यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. याचबरोबर भाजपाने ही आपले पत्ते उघडलेले नाहीत. मुंबईत याबाबत चर्चा व बैठका होत असल्याचे सांगितले जाते. महाविकास आघाडीतील अन्य घटकपक्षाचे स्थानिक नेते या निवडणुकीत उतरण्याची मागणी करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेेने उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल केला आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस यासह अन्य पक्षांशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येथील उमेदवार जाहीर करणार हे स्पष्ट आहे. स्थानिक पातळीतवर आघाडीतील घटक पक्षाचे स्थानिक नेते निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. यामुळे अगोदर वरिष्ठ पातळीवरूनच पक्षप्रमुखांचे आदेश स्थानिक पातळीवर पोहोचविले जातील व यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार एक दोन दिवसात जाहीर होईल असे दिसत आहे. यानंतरच भारतीय जनता पक्ष आपले पत्ते उघडेल असे दिसत आहे. सध्या स्थानिक पातळीवर भाजपाच्या गोटात शांतता असली तरी सारे लक्ष मुंबईकडे आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!