पंढरपर- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्यांपैकी अकरा जणांनी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी मागे घेतली असून यात परिचारक गटाचे दिग्गज नेते नागेश भोसले यांचा समावेश आहे. मात्र भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिध्देश्वर आवताडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपासमोर हे एक आव्हानं असणार आहे. निवडणूक रिंगणात 19 उमेदवार आहेत.
या निवडणुकीत महाविकास आघाडीसमोरही आव्हानं असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील तसेच अपक्ष अर्ज दाखल केल्याने शिवसेनेतून नुकतेच ज्यांना काढून टाकण्यात आलेले आहे त्या शैला गोडसे यांची उमेदवारी या निवडणुकीत कायम राहिली असल्याने येथील सामना आता बहुरंगी होणार आहे.
शनिवारी 3 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेणार्यांमध्ये महेंद्र काशीनाथ जाधव कासेगाव, इलियास हाजीयुसूफ शेख वाखरी, अलियास अब्दुलरऊफ जाफर मुलाणी पंढरपूर, संजय चरणू पाटील बह्मपुरी, अशोक ज्ञानदेव वाघमोडे नीळज करमाळा, अमोल अभिमन्यू माने धर्मगाव, मोहन नागनाथ हळणवर ईश्वर वठार, रामचंद्र नागनाथ सलगर धर्मगाव, नागेश आण्णासाहेब भोसले पंढरपूर, मनोज गोविंदराव पुजारी ब्रह्मपुरी, बापू दादा मेटकरी मेटकरवाडी यांचा समावेश आहे.
पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भगिरथ भारत भालके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), समाधान महादेव आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), राजाराम कोडींबा भोसले (बळीराजा पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, अभिजीत वामनराव आवाडे-बिचकुले, सुनिल सुरेश गोरे, सिताराम मारुती सोनवले, सिध्देश्वर बबन आवताडे, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडूरंग मसुरे, बिरुदेव सुखदेव पापरे हे 19 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी दिली.
मतदान शनिवार दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 07.30 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी रविवार दिनांक 02 मे 2021 रोजी होणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी यावेळी सांगितले.