पंढरपूर पोटनिवडणूक : महाविकास आघाडीत बिघाडी ?.. स्वाभिमानीकडून उमेदवारी अर्ज केला दाखल
पंढरपूर, – राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढविण्याचा मनोदय बैठक घेवून जाहीर केला होता. त्यानुसार आता तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
पंढरपूरची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होण्याच्या मार्गावर असून येथून निवडणूक लढविण्याची तयारी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी केली आहे. ही जागा राष्ट्रवादीचे आमदार कै. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झाली असल्याने सहाजिकच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच येथून आपला उमेदवार देणार आहे. मात्र आता मित्रपक्षातून निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनीही येथून लढण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे युवक काँग्रेसजे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी देखील काँग्रेससाठी या मतदारसंघातून उमेदवार दिला जावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अद्याप अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी कै. भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांनी आपला प्रचार सुरू केला असल्याचे चित्र आहे तर भाजपाने ही अद्याप येथून कोण रिंगणात उतरणार याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. येथून लढण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक, उद्योजक समाधान आवताडे, अभिजित पाटील तसेच डॉ.बी.पी.रोंगे इच्छुक आहेत.
दरम्यान महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे असे नाही. घटकपक्ष नाराज असल्याच्या चर्चा नेहमीच ऐकवयास मिळतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी हे देखील काही प्रश्नांवर नाराज असल्याचे दिसत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सत्तेत असो किंवा नसो ती नेहमीच शेतकर्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरत असतेच. या संघटनेने पंढरपूरची निवडणूक लढविण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता.