पंढरपूर- फलटण रेल्वे मार्गासाठी केंद्राची ठाकरे यांच्या सरकारकडे 575 कोटी रू. मागणी
पंढरपूर – स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकदा सर्व्हेक्षण होवून देखील प्रत्यक्षात न साकारलेल्या पंढरपूर- फलटण रेल्वे मार्गाला दोन वर्षापूर्वी रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली व 108 किलोमीटर या कामासाठी 1153 कोटी रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. आता केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविले असून यात या मार्गाच्या खर्चाचा अर्धा हिस्सा राज्य सरकारने उचलावा अशी मागणी केली आहे. तसेच यासाठीच्या जागा ही मोफत देण्याचा आग्रह केला आहे. दरम्यान यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकार असताना ही रेल्वे मंत्र्यांनी असा प्रस्ताव जुलै 2019 मध्ये राज्य सरकारसमोर ठेवला होता.
दरम्यान आता राज्यात नव्याने सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकार याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे. पंढरपूर ते फलटण या मार्गाचे सर्व्हेक्षण इंग्रज काळात झाले होते. मात्र याचे काम प्रत्यक्षात कधीच सुरू झाले नाही. स्वातंत्र्यानंतर ही रेल्वे मंत्रालयाने याबाबतचे सर्व्हे केले. हा मार्ग सोलापूर व सातारा जिल्ह्यातून जातो. या नवीन रेल्वे मार्गासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, संघर्ष समितीचे सोमनाथ वाघमोडे यांनी खूप प्रयत्न केले. यानंतर यास भाजपाच्या सरकारने मंजुरी दिली. या 108 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गासाठी 1153 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
या मार्गाला मंजुरी देण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंंत्री सुरेश प्रभू यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्याच हस्ते फलटण येथे या कामाची सुरूवात देखील करण्यात आली होती.
दरम्यान सध्याचे रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविले असून यात पंढरपूर- फलटण मार्गासाठी जो 1153 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे यापैकी अर्धा हिस्सा राज्य सरकारने उचलावा असा आग्रह करण्यात आला आहे. रेल्वेने अनेक नवीन प्रकल्पांना मान्यता दिली असून या सर्वच मार्गांसाठी रेल्वे मंत्रालय खर्च करू शकत नाही. यासाठी राज्य सरकारने ही यात हिस्सा उचलावा असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान याबाबत गोयल यांनी 8 जुलै 2019 ला देखील राज्य सरकारला पत्र पाठविले होते. तेंव्हा येथे भाजपा व शिवसेनेचे राज्य होते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. याचा उल्लेख त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला असून आपण याबाबतच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रतिसादाची वाट पाहात असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. या मार्गासाठीच्या जागा ही राज्य शासनाने मोफत रेल्वेला द्याव्यात अशी मागणी यात करण्यात आली आहे.
पंढरपूर – फलटण या नवीन रेल्वे मार्गाचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी माळशिरस येथील अँड. सोमनाथ वाघमोडे यांनी रेल्वेमंत्री गोयल यांच्याशी संपर्क केला होता.