पंढरपूर- मंगळवेढ्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच : पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही दावा

पंढरपूर– पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असणार्‍या शिवसेनेने ज्याप्रमाणे दावा केला आहे तशीच भूमिका आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली असून येत्या विधानसभा पोटनिवडणुकीत स्वाभिमानीला हा मतदारसंघ मिळावा अशी मागणी केली आहे. तसेच येणार्‍या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संघटना गतनिवडणुकीप्रमाणे ताकदीने उतरणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे आमदार कै. भारत भालके यांच्या निधनाने पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून यासाठी सर्वच पक्ष तयारी करत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून यात दोन्ही काँगे्रस व शिवसेनेसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हाती असून येथून कै. भारत भालके हे विजयी झाले होते. आता पोटनिवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने या जागेवर दावा सांगितला आहे. पक्षाचे जिल्हा समन्वय प्रा.शिवाजी सावंत यांनी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंढरपूर व मंगळवेढ्यात ही विधानसभेची जागा शिवसेनेची असल्याचे वारंवार सांगितले आहे. महायुतीच्या काळात सदरची विधानसभा जागा शिवसेनेला सोडली जात होती हे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच येथून लढण्याची शैला गोडसे यांनी गतनिवडणुकीत तयारी केली होती मात्र त्यांना संधी मिळाली नसल्याने आता त्याच उमेदवार असतील असे संकेत दिले होते.
आता यापाठोपाठ महाविकास आघाडीमधील दुसरा घटक स्वाभिमानी पक्षाने या जागेवर आपला दावा सांगितला आहे. राजू शेट्टी यांच्या या संघटनेची शुक्रवारी पंढरपूरमध्ये बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले की, पंढरपूर- मंगळेवढा विधानसभेची जागा लढविण्याची आमची तयारी आहे. ही जागा आमची असून 2009 ला पहिल्यांदा कै. भारत भालके यांना रिपब्लिकन डाव्या लोकशाही आघाडीचे तिकिट हे स्वाभिमानीच्या कोट्यातून मिळाले होते. ते आमचे उमदेवार होते व विजयी झाले. तसेच 2014 मध्ये महायुतीत पंढरपूरची जागा स्वाभिमानी पक्षाच्या वाट्याला आली होती. यामुळे येथून आमच्या उमेदवाराला तिकिट मिळाले पाहिजे.
2014 ला पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून महायुतीने प्रशांत परिचारक यांना स्वाभिमानीच्या कोट्यातून उमेदवारी दिली होती. दरम्यान आता स्वाभिमानी पक्षाने या जागेवर दावा सांगितला असल्याने महाविकास आघाडीत पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या जागेसाठी रस्सीखेच असल्याचे दिसत आहे.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ताकदीने लढविणार असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले आहे. मागील निवडणुकीत सभासद शेतकर्‍यांनी आम्हाला चांगले मतदान केले आहे. आम्ही यंदाही या कारखान्याची निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान याबाबत आता संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!