पंढरपूर, – पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक 17 एप्रिल रोजी होत असून मतमोजणी 2 मे ला होणार आहे. ही सारी प्रक्रिया वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमध्ये पार पडत आहे. सध्याच या भागात उन्हाचा पारा 40 डि. से. पेक्षा अधिक नोंदला जात आहे. यात आणखी वाढत जाईल. दरम्यान याच काळात राज्यात ठिकठिकाण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देखील वाढू लागला असून यात पंढरपूर भागाचा ही समावेश आहे. हे वाढते ऊन आणि कोरोनाचे आकडे याच बरोबर येथे आता निवडणुकीमुळे राजकीय ज्वर ही वाढू लागला आहे.
मागील एक वर्षापासून कोरोनाचे असणारे संकट अद्यापही कायम आहे. लस आली मात्र कोरोना कमी झालेला नाही. लसीकरण मोहीम आता वेगाने वाढविली जात आहे. मार्च अखेरीस राज्यात व सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे आकडे वाढतच चालले आहे. पंढरपूर तालुक्यात रोज दोन आकडी संख्या दिसतच आहे. यामुळे सहाजिकच आरोग्य यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय योजना शासन करत आहे.
याच परिस्थितीत आता पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक होत असून यासाठी राजकारण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षात याबाबत उत्सुकता आहे. उद्या 30 रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून यासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँगे्रसचे बडे नेते येथे उमेदवारांचे अर्ज दाखल होताना उपस्थित राहणार आहेत. यामुळे सहाजिकच गर्दी होणार हे निश्चित आहे. यासाठी आता या नेत्यांनीच कार्यकर्त्यांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करणे गरजेचे बनले आहे. निवडणूक म्हंटल की शक्तीप्रदर्शन हे आवश्यक असते, मात्र यातूनच कोरोनाचा फैलाव होवू शकतो.याची जाणीव आता सर्वांनीच ठेवणे गरजेचे बनले आहे. रोजचे कोरोनाचे वाढणारे आकडे जास्त आहेत. यामुळे आरोग्यविषयक नियम पाळणे अत्यावश्यक बनले आहे.
प्रशासकीय पातळीवर निवडणूक आयोग सर्व नियमांचे पालन ही प्रक्रिया पार पाडत आहे. अशावेळी आता राजकीय पक्ष ,कार्यकर्ते व समर्थकांनीही कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळणे गरजेचे आहे. सध्या मतदारसंघात गावभेटीचे दौरे होत आहेत. तसेच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत, तेथे ही सर्वांनी कोरोनाचे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण या कोरोनामुळे पंढरपूर भागात अनेक महत्वाच्या व्यक्तींना आपले प्राण गमावावे लागले आहेत हे विसरून चालणार नाही.
सध्या उन्हाची तीव्रता ही खूप वाढली असून पारा रोज वाढत आहे. चाळीस डिग्री से. पेक्षा जास्तची नोंद आहे. उन्हाळ्यात या भागात नेहमीच खूप ऊन असते व पारा 42 ते 43 डि.से. पेक्षा जास्त होतो. अशात ही पोटनिवडणूक होत आहे.