पंढरपूर- पंढरपूरची विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत चुरशीची होत असल्याचे चित्र आहे. येथे उमेदवारी दाखल करणार्यांची संख्या पाहता येथे पुढील दोन आठवडे राजकीय कलगीतुरा जोरदार रंगणार हे निश्चित आहे. येथील निवडणुकीचे चित्र 3 एप्रिलला स्पष्ट होईल. मात्र दिग्गज उमेदवारांनी आता आपला प्रचार सुरू केला आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके, भाजपाचे समाधान आवताडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, अपक्ष शैला गोडसे यांंनी आपला प्रचार सुरू केलेला आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात त्यांचे दौरे होत असून मतदारभेटीवर भर दिला जात आहे. कोरोनामुळे आरोग्यविषयक अनेक नियम कडक असले तरी निवडणुकीच्या उत्साहावर याचा परिणाम झालेला दिसत नाही. मागील चार दिवसात मतदारसंघातील राजकीय वातावरण फारच तापले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 38 उमेदवारांनी 44 अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यामध्ये राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, भाजपाचे समाधान आवताडे , अपक्ष नागेश भोसले यांच्यासह बिग बॉस फेम सातारा येथील अभिजित बिचकुले यांचा समावेश आहे. दरम्यान आज 31 मार्च रोजी छाननी आहे. तर 3 एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
येथे उमेदवारी दाखल करणार्यांमध्ये सिध्देश्वर आवताडे, परिचारक समर्थक नागेश भोसले, धनगर समाजाकडून माउली हळणवर यांच्यासह अब्दुल मुलाणी पंढरपूर, संजय पाटील ब्रम्हपुरी, अशोक वाघमोडे करमाळा, अमोल माने धर्मगाव मंगळवेढा, सतीश जगताप काकण इंदापूर, पोपट धुमाळ बोहाळी, सुरेखा गोरे फुरसंगी पुणे, सीताराम सोनवणे सोलापूर, सिध्दाराम काकणकी सिध्दापूर, शितल आसबे गोपाळपूर, बळीराम बनसोडे चळे, किशोर जाधव गोपाळपूर, सुधाकर बंदपट्टे पंढरपूर, रामचंद्र सलगर धर्मगाव मंगळवेढा, कपिल कोळी सोलापूर, सुदर्शन मसुरे पुसेवाडी, राजाराम भोसले वाढेगाव, मनोज पुजारी ब्रम्हपुरी, सुदर्शन खंदारे पंढरपूर, सिध्देश्वर आवारे मलिकपेठ, बिराप्पा गोरे तनाळी, बापू मेटकरी पाटकळ, बिरुदेव पापरे झगडेवाडी, गणेश डोंगरे यांचा समावेश आहे तर यापूर्वी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैला गोडसे आंबेचिंचोली, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील आंबे, संतोष माने लेंडवे, संजय माने कोर्टी, संदीप खरात, काशीनाथ जाधव कासेगाव, नागेश पवार इसबावी, इलियास शेख वाखरी यांनी उमेदवारी दाखल केली आहे.