पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादी व भाजपाची प्रतिष्ठाची पणाला, कोरोनाकाळातही प्रचाराने सार्‍या राज्याचे लक्ष वेधले

पंढरपूर – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षाने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसस पक्षाने आपली सारी ताकद येथे पणाला लावली आहे तर त्यांना शिवसेना व काँगे्रसने मोठी साथ केली. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी तीन पक्षाची आघाडी जनतेचे प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरत असल्याचे सिध्द करण्यासाठी भाजपाने येथे विजय मिळविण्याचा चंग बांधला आहे. उद्या शनिवारी 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर निकालासाठी पंधरा दिवस म्हणजे 2 मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
ही पोटनिवडणूक असली तरी कमालीची चुरस व राजकीय पक्षांनी केलेला प्रचार पाहता राज्यभर याची चर्चा सुरूवातीपासूच रंगत आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार कै. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवरील लढत बहुरंग होती असून येथे राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हे पहिलीच निवडणूक लढत आहेत. यापूर्वी ते जिल्हा परिषद निवडणुकीत उतरले होते मात्र पराभवाचा सामना करावा लागला होता. तर त्यांना आव्हानं देणारे भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे हे या मतदारसंघात 2014 व 2019 ला लढले आहेत. ते दोन्ही निवडणुकीत क्रमांक तीनवर राहिले आहेत. यंदा पंढरपूरच्या परिचारकांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी असल्याने येथे भाजपाला चमत्काराची आशा आहे.
गेले पंधरा दिवस अत्यंत चुरशीने प्रचार झाला आहे. एका बाजूला राज्यात कोरोनाची दुसरी लाट फोफावत असताना येथे मात्र राजकारणाला ऊत आला होता. दोन्ही बाजूंनी स्टार प्रचारक बोलावून सभा घेण्यात आल्या आहेत. दरम्यान याच काळात पंढरपूरमध्ये कोरोनाची रूग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. राष्ट्रवादीने ही जागा राखण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. निवडणुकीची सूत्रं उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हातात होती. काँगे्रस व शिवसेनेचे बडे नेते, मंत्री येथे प्रचारासाठी आले होते. दोन्ही तालुक्यात अनेक सभा झाल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह नेते, आमदार, मित्रपक्षांचे प्रमुख यांना प्रचारात उतरविले होते.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका भाजपाने केली आहे. तीन पक्षाच्या आघाडीला पराभूत करण्याचा चंग भाजपाने बांधला आहे. कारण यापूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत आघाडीने भाजपाचे पानीपत केले होते. या निवडणुकीत स्थानिक ते राज्य व देशपातळीवरील विषयांवर चर्चा झाली आहे. मंगळवेढ्याचा पाणीप्रश्‍न, स्थानिक विकासाचे मुद्दे, एमआयडीसी , साखर कारखान्यांची अवस्था यावर उहापोह झाला आहे. दरम्यान या निवडणुकीत महिला उमेदवार शैला गोडसे, स्वाभिमानी पक्षाचे सचिन शिंदे तसेच अपक्ष सिध्देश्‍वर आवताडे यांनीही प्रचारात आघाडी घेतली होती.
शनिवारी आता मतदान होत असून यानंतर पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मतमोजणी 2 मे ला होणार आहे. तोवर चर्चा रंगत राहतील हे निश्‍चित.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!