पंढरपूर शहरातील स्थानिकाला कोरोनाची लागण, करकंबमध्ये ही ठाण्याहून आलेला एक पॉझिटिव्ह

पंढरपूर, दि.28 – नुकतीच कोरोनामुक्त झालेल्या पंढरीत पुन्हा शहरातील स्थानिक एकजण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे तर तालुक्यातील करकंब येथे ही ठाणे येथून आलेले व विलगीकरणात असणार्‍या एका व्यक्तीस या आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान वाखरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये या दोन्ही रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर तालुक्यात 8 रूग्ण आढळून आले होते व ते सर्व बाहेरून आले होते व विलगीकरणात त्यांच्या स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र आता पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
येथील एका शाळेत शिक्षण म्हणून कार्यरत असणारे व एका सहकारी बँकेचा संचालक म्हणून काम पाहणार्‍या या व्यक्तीस कोरोनाची लागण झाली आहे. पंढरपूरमधील प्रदक्षिणा मार्गावर त्यांचे निवासस्थान आहे. तर दुसरा रूग्ण करकंब येथील असून तो दोनच दिवसापूर्वी ठाणे येथून गावी परत आला होता. मात्र त्यांना तेथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तेथे त्रास जाणवू लागल्याने त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना वाखरीच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात आजवर आठ रूग्ण आढळून आले असून ते सर्व बाहेरून आलेले आहेत. यात एका दोन वर्षाच्या परदेशातून आलेल्या बालकाचा ही समावेश आहे. उपरी,करकंब, बार्डी, गोपाळपूर व पंढरपूरमध्ये हे रूग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या पंढरपूर व सोलापूर येथे उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे आषाढीच्या तोंडावर पंढरपूर कोरोनामुक्त होते. मात्र आता तालुक्यात पुन्हा दोन रूग्ण आढळून आले आहेत.पंढरपूर शहरातील स्थानिकाला कोरोनाची लागण होण्याची आजची पहिलीच वेळ आहे. यातच हे रूग्ण शिक्षक व बँकेचे संचालक आहेत.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूरची आषाढी वारी रद्द करण्यात आलेली आहे. राज्यात व सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता येथे भाविकांना येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. येथे येणार्‍या रोखण्यासाठी त्रिस्तरीय बंदोबस्त जिल्ह्यात लावण्यात आला आहे. आता नेमके आषाढीच्या पूर्वीच पंढरपूर शहर व करकंबमध्ये रूग्ण आढळून आल्याने प्रशासन आणखीच अलर्ट झाले आहे.

आरोग्य विभागाने ४७ स्वँब तपासणीसाठी घेतले होते, यापैकी ३९ अहवाल प्राप्त झाले आहेत. ३६ निगेटिव्ह आहेत तर दोन पाँझिटिव्ह आहेत. ८ प्रलंबित आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!