पंढरपूर शहरात कडक संचारबंदीस सुरुवात ; जागोजागी पोलीस बंदोबस्त
पंढरपूर दि.7- जिल्ह्यासह तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभर यांनी सात दिवस संचारबंदीचे आदेश पारित केले आहेत. शहरात पहिल्याच दिवसांपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु असून जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, संचारबंदीच्च्या कडक अंमलबजावणीसाठी शहरात 137 पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच 250 कोरोना वॉरियर्सचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरात सात दिवसांच्या संचारबंदी कालावधीत दूध, हॉस्पिटल व मेडीकल या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोणीही विनाकारण फिरताना आढळूण आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंध कायद्यातंर्गत कडक कारवाई करण्यात येईल असेही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी सांगितले .
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात रॅपिड ॲटीजेन टेस्टची मोहिम सुरु असून नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेवून , आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी केले आहे.
तालुक्यातील टाकळी येथे काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. टाकळी हा परिसर पंढरपूर शहराला लागूण असल्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात रॅपिड ॲटिजेन टेस्ट सुरुवात केली आहे. तालुक्यात आज एका दिवसात विविध गावांमध्ये 500 रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.
रॅपिड ॲटिजेन टेस्टमुळे रुग्ण संख्येत काहीशी वाढ होताना दिसत असली तरी नागरिकांनी चिंतीत न होता रुग्ण सापडणे हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर आहे. हे लक्षात घेवून रुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर आणि कोरोनाची साखळी तोडण्यास अधिकाअधिक भर देण्यात येणार असल्याचे श्री. घोडके यांनी सांगितले.